...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 09:12 AM2024-09-18T09:12:29+5:302024-09-18T09:13:34+5:30
विधानसभेलाही आमची तीच भूमिका आहे. जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन चालायचे. जे सोबत नाहीत त्यांची चिंता करायची गरज नाही असं पटोलेंनी म्हटलं आहे.
मुंबई - मला लांगूनचालन करायचे असते तर मी केंद्रात मागच्या आणि आत्ताच्या टर्मलाही मंत्री राहिलो असतो. जिथं मी खुर्ची घेऊन जनतेसाठी नाही तर स्वत:साठी आणि कुटुंबासाठी काम करत असेन तर ती खुर्ची माझ्या कामाची नाही. मी अनेक खुर्च्या सोडलेला माणूस आहे. माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी उपयुक्त करण्याची माझी क्षमता आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्रिपदाबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.
नाना पटोले म्हणाले की, मी कधीही खुर्चीची लढाई लढली नाही, कायम जनतेची लढाई लढलीय. त्यामुळे मला फळ काय मिळते यापेक्षा माझा पक्ष कसा मजबूत होईल. महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा मिळेल हेच काम मी केले आहे. फळाची चिंता करण्यापेक्षा कर्मावर भरवसा ठेवणारा मी आहे. मला लांगूनचालन करायचे असते तर मी केंद्रात मागच्या आणि आत्ताच्या टर्मलाही मंत्री राहिलो असतो. जिथं मी खुर्ची घेऊन जनतेसाठी नाही तर स्वत:साठी आणि कुटुंबासाठी काम करत असेन तर ती खुर्ची माझ्या कामाची नाही. मी अनेक खुर्च्या सोडलेला माणूस आहे. खुर्चीची लढाई कधीच लढलो नाही. कर्मावर विश्वास आहे. मी माझे राजकीय गुरु विलासराव देशमुख यांचा शिष्य आहे. ते मला सांगायचे, वेळेच्या पहिले आणि नशिबाच्या जास्त काही प्राप्त होत नाही. माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी उपयुक्त करण्याची माझी क्षमता आहे. आज त्याची काळजी माझ्या डोक्यात न ठेवता महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा देतील हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे जनतेचा कौल आणि उद्याच्या नेतृत्वाचा निर्णय त्याचे आम्ही स्वागत करतो असं त्यांनी म्हटलं. एबीपीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच मुख्यमंत्रिपद हा निवडणुकीनंतरचा भाग आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला बाहेर काढणं हे काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यासाठी या सरकारचा भ्रष्ट कारभार, शिवद्रोही कसे, महाराष्ट्रद्रोही कसे हे जनतेपर्यंत पोहचवणं माझे काम आहे. त्यानंतर ज्येष्ठ नेते बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील. आमचे जे पहिले टार्गेट आहेत ते पूर्ण करायचे आहे. महाविकास आघाडीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. महायुतीत हिटलरशाही आहे. त्याठिकाणी दिल्लीत २ लोक बोलले तर खाली कुणाला बोलायची हिंमत नाही. आमच्या पक्षात असो वा महाविकास आघाडीत लोकशाही आहे आणि प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. शिर्डीच्या भाषणात स्वत: उद्धव ठाकरे यांनी मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही त्यामुळे तो विषय आमच्यासाठी संपला. आज महाराष्ट्रात ७३ टक्के भागात ओला दुष्काळ आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार जाणुनबुजून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करतेय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायेत. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. महागाई, बेरोजगारी वाढली आहे मात्र मित्रांना फायदा कसा होईल यासाठी नरेंद्र मोदी सरकार काम करतेय असा आरोपही पटोलेंनी केला.
दरम्यान, काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्या मित्रपक्षांना सोबत घेऊन चालणं हा आमचा विचार आहे. उघडपणे आम्ही भूमिका मांडतो. कुणालाही धोका देत नाही. लहान भाऊ, मोठा भाऊ यातही आम्ही पडलो नाही. जे काही आम्हाला मिळाले त्यातून चांगले करण्याचा प्रयत्न केला. त्यात काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले. विधानसभेलाही आमची तीच भूमिका आहे. जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन चालायचे. जे सोबत नाहीत त्यांची चिंता करायची गरज नाही. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी आमचे अनेक नेते सोडून गेले, पण आम्ही चिंता करत बसलो नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही तिथे जिंकलो, नवीन नेतृत्व उभं केले. त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही. मैत्री करतो, मैत्री निभावतो. घाबरणं, आत्मविश्वास नाही असं नाही. काँग्रेस पक्ष तळागाळातला आहे. शेतकऱ्यांचा तरुण मुलांचा पक्ष आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं.
काँग्रेस १०० जागा जिंकणार?
आम्ही १०० च्या आसपास जागा जिंकू. महाविकास आघाडी म्हणून १७५-२०० जागा आम्ही जिंकणार असा रिपोर्ट आला आहे. जागावाटप त्या आधारे करू. महाविकास आघाडी म्हणून बहुमताचे सरकार आणू. राज्यातील जनतेसाठी काम करणारं सरकार लोकांच्या आशीर्वादाने येईल. महायुतीत महाभारत सुरू आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती समोर येईल. आमच्यात सामोपचाराने बोलणी सुरू आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्रित आलोय खोक्यासाठी नाही. महाविकास आघाडीत जागा कुणाला जास्त मिळतात हा प्रश्न नाही. आम्ही २८८ जागा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून लढणार आहोत. मविआला आणखी काही खासदार लोकसभेला जिंकता आले असते. काही कमतरता राहिली ती आता विधानसभेला भरून निघेल त्यातून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणू असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.
बंडखोरी होणार नाही
महाराष्ट्रातील भ्रष्ट महायुती जे शिवद्रोही आहेत त्यांना सत्तेतून बाहेर काढू त्यानंतर महाविकास आघाडीचे जे आमदार असतील त्यातून मुख्यमंत्री ठरवू ही भूमिका आम्ही तिन्ही पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटणं स्वाभाविक आहे. परंतु महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असावा हेच आम्हाला वाटतं मी जे काही महाराष्ट्रात प्लॅन केलाय तो स्पष्ट आणि प्रामाणिक आहे. त्याला कुठेही गटबाजी, अप्रामाणिकता राहणार नाही. ज्याचे सर्व्हेमध्ये नाव येईल, लोकांमधून नाव येईल तोच उमेदवार दिला जाईल. मेरिटवर तिकिट दिल्यानंतर बंडखोरीचा विषय राहत नाही. जिथं कमकुवत व्यवस्था असते, त्यामुळे गटबाजी होऊन बंडखोरी केली जाते. आमच्या पक्षात जास्त बंडखोरी होण्याचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात सत्ता येतेय, त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय कसा देता येईल हे आम्ही प्रयत्न करू असं नाना पटोलेंनी सांगितले आहे.