ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - मुली मुलांसारखे कपडे परिधान करू लागल्यास त्यांचे विचारही मुलांसारखेच होतात, असं वक्तव्य मुंबईतल्या एका प्रतिष्ठित मुलींच्या कॉलेजच्या मुख्याध्यापिकांनी केलं आहे. मुलींनी मुलांसारखे शर्ट आणि पँट घातल्यास त्या पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोंम (पीएसओडी)ची शिकार होऊ शकतात. या आजारामुळे मुलींचे हॉर्मोन्स असंतुलित होऊन त्या मुलांसारखा विचार करू लागतात आणि ब-याचदा मुलींचाच द्वेष करतात. ज्यावेळी त्या मुलांसारखे शर्ट आणि पँट घालतात. त्या वेळी त्यांच्या मेंदूमध्ये परिवर्तन होऊन त्या मुलांसारखाच विचार करू लागतात. त्यामुळे कमी वयातही त्यांच्यात अनेक बदल होऊन त्या पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोंमला बळी पडतात. मुंबईतल्या मुलींच्या कॉलेजच्या मुख्याध्यापिका स्वाती देशपांडे यांनी व्यासपीठावर हे वक्तव्य केलं असून, त्यांनी लवकरच मुलींच्या ड्रेसकोडमध्ये बदल करून सलवार कमीज करणार असल्याचं सांगितलं आहे.
सध्या या कॉलेजच्या मुली मुलांसारखे सफेद शर्ट आणि काळी पँट परिधान करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांकडून कँटीनमध्ये मुलींची छेड काढण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुलींच्या कँटीनचंही वाटप करण्यात आलं आहे. कॉलेजच्या अधिका-यांनी कँटीनला दोरीच्या सहाय्यानं विभागलं असून, कॉलेजनं मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं गंभीर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.