मुंबई- राज्याच्या राजकारणात 23 नोव्हेंबरला मोठा भूकंप झाला होता. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. दोन भिन्न विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे हे नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्रात राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर झी चोवीस तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी या एकत्र येण्यावर मोठा खुलासा केला आहे.शरद पवारांशी एकत्र येण्यासंदर्भात का बोलला नाहीत, असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, अजितदादांनी मी पवारांशी बोललो आहे, असा विश्वास दिला होता. पवार साहेबांना मी ही भूमिका सांगितलेली आहे, असंही अजित पवार म्हणालेले होते. विशेष म्हणजे अजित पवारांची ही भूमिका राष्ट्रवादीच्या बऱ्याच आमदारांना माहीत होती, त्यामुळे भाजपासोबत ते का आले, याचं उत्तर अजित पवारच देऊ शकतील, असं म्हणत फडणवीसांनी चेंडू राष्ट्रवादीकडे टोलवला. अजित पवार आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला काँग्रेससोबत जायचं नाही. हे तीन पक्षाचं सरकार चालू शकत नाही, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. मी पवारसाहेबांशी चर्चा केलेली आहे. आमच्या बहुतांश आमदारांचं मत असं आहे की, तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही. त्यामुळे आम्ही भाजपासोबत यायला तयार आहोत. आपण सरकार तयार करू आणि एक स्थिर सरकार देऊ, असं अजित पवार म्हणाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आमच्या शपथविधीच्या दोन-तीन दिवसांपासूनच अजितदादांशी चर्चा सुरू झाली होती. काही गोष्टी पवारसाहेबांच्या स्तरावर होत होत्या. शपथविधी घेण्याच्या एक-दोन दिवस आधी अजितदादा आमच्याकडे आले होते. तीन पक्ष एकत्र सरकार चालवू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, असं अजितदादा म्हणाले होते. त्यावेळी या तिन्ही पक्षांनी मिळून आम्हाला साइडलाइन केलं होतं. ज्या पक्षाला सर्वात मोठा जनादेश मिळालेला आहे, तो पक्ष पूर्णपणे बाजूला काढण्यात आला होता. अशा परिस्थितीत राजकारणामध्ये गनिमी कावासुद्धा खेळावा लागतो. तो आमचा गनिमी कावा फसला, पण हे करणं त्यावेळी महत्त्वाचं होतं, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे.
...म्हणून अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं, फडणवीसांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 6:17 PM