मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादलाही भेट देणार आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबादमधील आयोजित रोड शो दरम्यान त्यांच्या मार्गात असणाऱ्या झोपड्या दिसू नये, यासाठी अहमदाबाद महानगरपालिकेकडून ६०० मीटरची भिंत बांधण्यात येत आहे. यावरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या खास शैलीत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडे आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसे करायचे नाही, असे म्हणत टोला लगावला आहे.
('मासिक पाळीची बातमी डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू नये म्हणून कोणती नवी भिंत उभारणार?')
याशिवाय, उलट भिंतीचा अडसर दूर करून कर्जत-जामखेडमधील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत एक व्हिडीओ रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कर्जत-जामखेडमधील ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४-२५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा व्हाईट हाऊसने जाहीर केल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यात भारत-अमेरिकेदरम्यान काही करार होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार आहे. त्यामुळे अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला इंदिरा ब्रिजशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला अनेक झोपड्या लपविण्यासाठी मोठी भिंत उभारली जात आहे.
विशेष म्हणजे, भिंत उभारण्यात येत असल्याचे महापौरांनाच माहीत नाही. मी भिंत पाहिलेली नाही. मला याबाबत काहीच माहीत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून विरोधकांकडून गुजरातमधील सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हॉस्टनमध्ये 'हाउडी मोदी' कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर आले होते. त्यावेळी भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी अबकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणाही केली होती.