मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईतील लोकल रेल्वे गाड्या आणि बेस्ट बसेस बंद ठेवण्याची मागणी होत असली तरी अत्यावश्यक सेवांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या वाहतूक सेवा सुरू ठेवणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. खासगी आस्थापनातील कर्मचा-यांना घरी बसून काम करण्यास सांगण्यात आले आहे, तर सरकारी कार्यालयातील कर्मचाºयांची उपस्थिती २५ टक्क्यांवर आणली आहे. लोकल रेल्वे गाड्यांची प्रवासी संख्याही रोडावली आहे. मात्र, लोकलसह बेस्ट बसेसची सेवा थांबविता येत नाही. कारण, महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिकांचे चालक यांना ये-जा करण्यासाठी या परिवहन सेवांखेरीज दुसरा मार्ग नाही. त्यामुळे सध्यातरी या सेवा बंद करत नाही. मात्र, भविष्यात गरज पडली तर त्याबाबतही विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.प्रतिबंधक उपचाराचा गोल्डन अवर सुरूमुंबई : गोल्डन अवरमध्ये रुग्णाला उपचार मिळाले तर त्याला जीवदान मिळते. त्याचप्रमाणे राज्यात आता कोरोना प्रतिबंधात्मक उपचाराकरिता गोल्डन अवर सुरू झाला असून त्याचा प्रादुर्भाव दुसºया टप्प्यातच संपवायचा आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.राज्य सरकारने जाहीर केलेल्या बंदी आदेशाबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, आपण कोरोनाच्या दुसºया टप्प्यात असून पुढचे टप्पे टाळण्याकरिता काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. मात्र त्याचा फायदा हा राज्याला होईल. पुढचे दहा ते पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे असून यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कायदा वापरताना त्याचा जुलूम होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. रुग्णालयांवर अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी घेतानाच ज्यांच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलात येतील त्या पुढे ढकलाव्यात. प्राथमिक तपासणी करणाºया डॉक्टरांना एन ९५ मास्क द्यावा, असेही त्यांनी सांगितले.कोरोनाची लागण टाळण्यासाठी संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने काही पावले उचलली आहेत. स्थानिक प्रशासनाने जीवनावश्यक बाबी, पाणीपुरवठा, साफसफाई, आरोग्य व्यवस्था, औषध दुकाने, किराणा दुकान, भाजीपाला आदी सुरू राहील, याची खबरदारी घ्यावी. नागरिकांनी व्यापक जनहिताकरिता घरीच थांबावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.तर, नागरिकांचे समस्या जाणून शंका निरसनासाठी जिल्हास्तरावर अधिकाºयांची नेमणूक करावी, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी दिल्या.‘रक्तदान शिबिर घ्यावे’राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदतीला काही सामाजिक संस्था, खासगी संस्था, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक पुढे येत आहेत. एप्रिल-मे च्या काळात राज्यात रक्ताची उपलब्धता कमी प्रमाणात असते. अशा परिस्थितीत पुरेसा रक्तसाठा असावा याकरिता कमीत कमी संख्या असलेले रक्तदान शिबीर घ्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
...म्हणून लोकल बंद ठेवता येत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 7:12 AM