मुंबई : केंद्र सरकारकडून इंधनाच्या दरामध्ये 2.5 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लगेच राज्य सरकारने डिझेलच्या किमतीत बदल न करता फक्त पेट्रोलच्या किमतीत 2.5 रुपयांची कपात केली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर शिक्कामोर्तब केले.राज्यात डिझेलच्या दरात कपात न केल्यामुळे डिझेल वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, यावर राज्य सरकारकडून असे सांगण्यात येत आहे की, देशात डिझेल स्वस्त दरात विकण्याच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप टेनमध्ये आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, डिझेलच्या बाबतीत आपण देशात आठव्या क्रमांकावर असून आपले दर आधीच कमी आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राने जरी डिझेलच्या किंमतीत कपात केलेली नसली तरीही शेजारच्या गुजरातमध्ये पेट्रोलसह डिझेलच्या किमतीत 2.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकूण 5 रुपयांची कपात केल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी 2.5 रुपयांनी इंधनाचे दर कमी करण्याची घोषणा केली. तसेच राज्य सरकारांनाही आणखी 2.5 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आवाहन केले. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने लगेचच 2.5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.