पुणे : देशभरातील सर्वाधिक तापमान कोकणातील भिरा येथे गेल्या काही दिवसांत किमान दोन ते तीन वेळा नोंदविले गेले़ त्यामुळे सर्वांचेच लक्ष भिराकडे वेधले गेले़ राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातून येणारे उष्ण वारे समुद्रसपाटीला असलेल्या भिरासारख्या ठिकाणी पूर्वेकडून खाली येत असल्याने तेथील तापमानात नेहमीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने वाढ होते़ त्यामुळे तेथील तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे़ याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, वाळवंटी प्रदेशातून ४० अंश सेल्सिअस तापमान असलेले गरम वारे महाराष्ट्रात येत आहेत़ भिरा हे समुद्रसपाटीला आहे़ तेथून सह्याद्रीची उंची साधारण ६०० मीटर आहे़ भिरा येथे हे गरम वारे पूर्वेकडून येत आहेत़ वारे जसे उंच जातात, तसे ते थंड होत असतात़ वर जाताना साधारण १ किमीला वाऱ्यांचे तापमान १० अंशाने कमी होते़ याच्या उलट खाली येताना त्यात वाढते़ त्यामुळे भिरा येथील तापमानात साधारण ५ अंश सेल्सिअसने वाढ होते़ तेथे सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमान असताना तेथील प्रत्यक्ष तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाते़ मुंबईत येणारे वारे हे उत्तरेकडून येत असल्याने तसेच तेथे आर्द्रता जास्त असल्याने ते जाणवत नाही़ वाळंवटी प्रदेशाकडून येणारे गरम वारे हे पूर्णपणे कोरडे असतात़ भासमान तापमान आणि हवेतील आर्द्रता यावर प्रत्यक्ष जाणवणारे तापमान किती जाणवते ते अवलंबून असते़ कोरड्या हवामानात ते जास्त जाणवते तर, दमट हवामानात कमी जाणवते, असे डॉ़ कुलकर्णी यांनी सांगितले़
‘भिरा’ला इतके तापमान का?
By admin | Published: April 12, 2017 4:26 AM