"नियमांमध्ये बदल करुन आता त्यांच्याकडे तारीख मागितली जात आहे. यापूर्वी घटनेप्रमाणे त्यांनी दोनदा तारीख दिली तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नाही. राज्यपालांनी दिलेल्या तारखेला ती निवडणूक न घेणं हा राज्यपालांचा आणि पर्यायानं घटनेचा अवमान असतो. घटनेचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरही राष्ट्रपती राजवट लागू शकते," असं मोठं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं.
"मला या चर्चेमध्ये पडायचं नाही. राज्यपाल हे एक स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचं हे तेच ठरवतील," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. विधानसभा अध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने महाविकास आघाडीच्या तीन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी राज्यपालांकडे सुपूर्द केला. मात्र यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायदेशीर सल्ला घेणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला अनुमती देण्यासाठी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठीची तारीख राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर निश्चित करावयाची आहे. विधिमंडळांच्या नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीला महत्त्व असल्याचे महाराष्ट्र विधिमंडळाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव व विधिमंडळ कामकाजाचे तज्ज्ञ डॉ. अनंत कळसे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.