मुंबई : शीना बोरा हत्याकांडाशी पीटर मुखर्जीचा संबंध नाही, असा ‘फीडबॅक’ मुंबई पोलिसांनी त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. राकेश मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी होण्यास हा ‘फीडबॅक’च कारणीभूत ठरला. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच शनिवारी तसे सूतोवाच पत्रकारांशी बोलताना केले. पीटर मुखर्जीचा या हत्याकांडाशी संबंध नसल्याची माहिती मला मुंबई पोलिसांनी त्या वेळी दिली होती. मात्र, नंतर सीबीआयच्या चौकशीत हा संबंध उघड झाला, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी राकेश मारिया यांचे नाव घेतले नाही. या हत्याकांडाच्या तपासादरम्यानच मारिया यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून गेल्या सप्टेंबरमध्ये हटविण्यात आले होते. त्यांना महासंचालक (होमगार्ड्स) म्हणून पदोन्नतीवर पाठविण्यात आले तरी शीना बोरा हत्याकांड प्रकरणातूनच मारिया यांना आयुक्तपदावरून जावे लागल्याची चर्चा त्या वेळी होती. मुख्यमंत्र्यांनी आज या संदर्भात संकेत दिले. (विशेष प्रतिनिधी) हे हत्याकांड उघडकीस आले तेव्हा मारिया हेच मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि तपासाची सर्व सूत्रे त्यांनी स्वत:कडे घेतली होती. ‘मुंबई पोलिसांनी अधिक सक्षम असावे अशी माझी अपेक्षा होती‘ असे सूचक उद्गार काढून मुख्यमंत्र्यांनी शीना बोरा हत्याकांडात तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या क्षमतेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीबीआय या हत्याकांडाच्या अनुषंगाने मारिया तसेच देवेन भारती आणि सत्यनारायण चौधरी या दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासून बघत आहे.
...म्हणून राकेश मारियांना हटविले
By admin | Published: October 30, 2016 2:59 AM