ऑनलाइन लोकमत
सैराटच्या आधी कुठल्या मराठी चित्रपटाची इंग्रजी माध्यमांनी इतकी दखल घेतली होती ? कुठला शेवटचा मराठी चित्रपट आहे ज्याचा खेळ मध्यरात्री तीन वाजता चित्रपटगृहात दाखवला होता ? कुठला मराठी चित्रपट आहे ज्याचा दुबईमध्ये विशेष खेळ झाला ? या सर्वप्रश्नांचे उत्तर एकच आहे सैराट.
सलग सहा आठवडे चित्रपटगृहात राहणारा हा चित्रपट फक्त मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर, अमराठी प्रेक्षकांनाही मोठया प्रमाणात पसंत पडला आहे. सैराटने भाषेची वेस केव्हाच ओलांडली असून, सैराट आता दक्षिणेतील चार भाषांमध्ये बनणार असल्याची माहिती आहे. मराठीसह अन्य भाषिक प्रेक्षकांनाही हा चित्रपट इतका का आवडला असावा ? याची कारणे चित्रपटाच्या निर्मितीमध्ये दडली आहेत.
सैराटच्या सादरीकरणामध्ये त्याचे यश दडले आहे. याचे श्रेय दिग्दर्शकाला जाते. सैराट म्हणजे फक्त दोन किशोरवयीन तरुण-तरुणीची प्रेमकथा नाही. जातीसंघर्षाच्या पलीकडे जाणारा हा चित्रपट आहे. चित्रपटातील कलाकारांची निवड हासुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. चित्रपटातील सर्व पात्रे विश्वसनीय आणि वास्तववादी वाटतात.
परश्या-आर्चीबरोबर असणा-या त्यांच्या मित्रांनी अभिनय कुठे ओढून ताणून केला आहे, असे वाटत नाही. त्यांच्या भूमिका ख-याखु-या मनाला भिडणा-या वाटतात. प्रेमकथेमध्ये नवीन चेहरे असतील तर, त्यांच्यातील निरागसता लोकांना जास्त आवडते. सैराट फक्त नवीन चेह-यांमुळेच नव्हे तर, त्यांच्या जबरदस्त अभियनामुळे प्रेक्षकांना जास्त पसंत पडतो. या चित्रपटात प्रेक्षक कलाकारांच्या अभिनयाच्या प्रेमात पडतात.
चित्रपट पाहून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक कलाकाराचे काम त्यांच्या लक्षात राहते हा विशेष गुण आहे. आर्चीचा बिनधास्तपणा आणि परश्याचा लाजाळूपणाही प्रेक्षकांना आवडला आहे. दिग्दर्शकाने चित्रपट बनवताना काळसुसंगतीचे जे भान दाखवले आहे त्यामुळेही हा चित्रपट अन्य भाषिक प्रेक्षकांना जास्त जवळचा वाटतो.