मुंबई : पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा शरद पवार यांच्याकडे मतदारसंघासाठी महाविद्यालय असावे, अशी मागणी केली होती. मात्र, शरद पवार हसले आणि म्हणाले की, तुझ्या मतदारसंघात महाविद्यालयाची गरज नाही. तर साखर कारखान्याची गरज आहे. त्यामुळे साखर कारखान्यासाठीचा प्रस्ताव घेऊन ये. त्यानंतर आम्ही साखर कारखान्याचा प्रस्ताव दिला आणि शरद पवार यांनी तो मंजूर केला. केवळ आठ महिन्यांत साखर कारखाना उभा केला. शरद पवार यांनी दूरदृष्टीने तो निर्णय घेतला होता. त्याचा आज सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे, अशी आठवण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितली.‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील यांच्याशी अराजकीय गप्पा मारल्या. यावेळी आजवरच्या प्रवासातील टप्पे आणि किस्से याबद्दल वळसे-पाटील मोकळेपणाने बोलले. पदवी घेतल्यानंतर कुठेतरी नोकरी करावी, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी ते मला शरद पवार यांच्याकडेही घेऊन गेले होते. परंतु, नोकरी करण्यापेक्षा राजकारणात जावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे १९८१ ते १९८८ या कालावधीत शरद पवारांचा स्वीय सचिव म्हणून काम पाहिले. त्यामुळे अनेकांचा सहवास लाभला, ओळखी वाढल्या. घरातूनच राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली, राजकारणात येऊन पद मिळवणे हा हेतू कधीच नव्हता, असं त्यांनी प्रांजळपणे सांगितलं.देवेंद्र फडणवीस हे फोकस असलेले व्यक्तिमत्त्व आहे. मात्र, विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना, प्रतिक्रिया देताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहिल्यास त्यांनाच त्याचा जास्त फायदा होईल, असा सल्लाही वळसे-पाटील यांनी दिला.
------
मतदारसंघात डी.एड. कॉलेजची इच्छा त्यावेळी जरी राहिली, तरी डी.एड. नाही, पण बी.एड. कॉलेज मंजूर करून घेतले आणि पुढे उच्च तंत्रशिक्षण मंत्री झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी बी.एड., डी.एड. कॉलेजेस मागितली, ती मंजूर करून दिली.- दिलीप वळसे-पाटील