मुंबई – शरद पवार आमच्यासाठी आदरणीय आहे. राज्याच्या विकासात, अनेक घडामोडीचे ते साक्षीदार आहे. अनेक पंतप्रधानांसोबत त्यांनी काम केलंय. शरद पवार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला चॅलेंज देतात ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाईट वाटते. खासगीत शरद पवारही मान्य करतील नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आजपर्यंत देशाला मिळाले नाही. कधीतरी तेदेखील शरद पवारांना साथ देतील असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांबाबत जे काही म्हटलं. देवेंद्र फडणवीसांविरोधात जितकी बेईमानी केली अखेर त्यांचे हाल काय झाले? उद्धव ठाकरेंना त्यांच्याच लोकांनी सोडले. राष्ट्रवादीच्या लोकांनी शरद पवारांना सोडले. देवेंद्र फडणवीसांसोबत बेईमानी करून कुणी सुखी झाले नाही. त्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागले. देवेंद्र फडणवीस यांची कायशैली आणि सहनशीलता पाहता शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. फडणवीस पुन्हा आले ते त्याग करून आले. मुख्यमंत्री न बनता राज्यासाठी आणि पक्षाच्या वरिष्ठांनी जो निर्णय दिला तो कार्यकर्ता म्हणून स्वीकारला. पक्षासाठी कसा त्याग केला जातो हे शरद पवारांनी सांगायला हवं. दुसऱ्यांना मोठे बनवण्याची इच्छाशक्ती नसते त्यांच्या पक्षात विभाजन होते. देवेंद्र फडणवीस यांचा त्याग ही महाराष्ट्र भाजपाची ताकद आहे. लाखो कार्यकर्ते हे उदाहरण घेऊन काम करते. हा त्याग कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरतो असं त्यांनी सांगितले.
तसेच राजकारणासाठी राजकारण, विरोधासाठी विरोध करायचा आणि आपले अस्तित्व टिकवायचे. उरलीसुरली राष्ट्रवादी थांबवून ठेवायची त्यासाठी ते मोदींचा विरोध करताना दिसतात. अंर्तमनातून ते मोदींचा विरोध करत नाही. शरद पवारांनी मोदींवर टीका करण्याऐवजी पक्षीय आत्मपरिक्षण करावे. त्यांच्या कार्यकाळातील पंतप्रधान यात मोदींची उंची मोठी आहे. त्यामुळे किमान शरद पवारांनी मोदींवर टीका करणे हे टाळले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे असंही बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन जो जो आमच्यासोबत येईल त्यांना आम्हीसोबत घेऊ. देश कल्याणासाठी घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. मोदींच्या त्यागाला साथ दिली पाहिजे असं अनेकांना वाटते. कधीतरी शरद पवार यांनाही नरेंद्र मोदींना साथ दिली पाहिजे असं वाटेल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.