आक्रमक आणि वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यामध्ये बुधवारी सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाषण संपवण्याची सूचना दिल्याने संतप्त झालेल्या पडळकरांनी थेट उपसभापतींसोबतच वाद घातला. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी आपला अधिकारांचा वापर करत गोपीचंद पडळकर यांना खडेबोल सुनावले. वातावरण तापलेलं असताना इतर सदस्यांनीही मागणी केल्याने अखेर पडळकर यांनी नमते घेत दिलगिरी व्यक्त केली.
त्याचं झालं असं की, काल विधान परिषदेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर हे जत तालुक्यातील काही प्रश्नांवर बोलत होते. त्यावेळी उपसभापतींनी त्यांचं म्हणणं संक्षिप्तपणे मांडण्याची सूचना पडळकरांना दिली. त्यावरून पडळकरांचा पारा चढला. त्यांनी इतर सभासदांना मिळणाऱ्या अधिकच्या वेळेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच उपसभापतींशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे ह्यासुद्धा संतप्त झाल्या. हे वर्तन बरोबर नाही. तुम्हाला ताकीदसुद्धा मिळाली आहे, असं पडळकरांना सुनावलं. त्यामुळे अधिकच संतप्त झालेल्या पडळकरांनी उपसभापतींचा निषेध केला. तसेच यादरम्यान हातातील कागद फाडले. नंतर पडळकरांनी सभागृहात आपले प्रश्न मांडले. यादरम्यान, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभापतींच्या खुर्चीचा मान राखावा, असं आवाहन पडळकरांना केलं. तर इतर सदस्यांनीही पडळकरांनी घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली.
त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही सभागृहातील वर्तनाबद्दल पडळकरांना खडेबोल सुनावले. तसेच तुम्ही आज सभागृहात जे काही वर्तन केलं आहे त्याची शिक्षा म्हणून मी उद्या दिवसभर तुम्हाला सभागृहात बोलू देणार नाही. हा माझा निर्णय आहे. तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. तुम्ही या ठिकाणी सभापतींच्या आसनाचा अपमान केला आहे. तो फक्त माझा अपमान नाही तर सभागृहाचा अपमान आहे. त्याची तुम्हाला जाणीव नाही आहे. आता तुम्हाला बोलायला मिळणार नाही. नाहीतर तुम्हाला मार्शलना बोलावून बाहेर काढावं लागेल, असे नीलम गोऱ्हे यांनी पडळकरांना सांगितले.