...म्हणून आमदार अपात्रतेच्या निकालाला लागला उशीर, राहुल नार्वेकरांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 03:53 PM2024-01-09T15:53:06+5:302024-01-09T15:53:52+5:30
MLA Disqualification Case: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासह संपूर्ण राज्यातील राजकीय विश्वाचं लक्ष लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या १० जानेवारी रोजी लागणार आहे.
शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासह संपूर्ण राज्यातील राजकीय विश्वाचं लक्ष लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या १० जानेवारी रोजी लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणी निकाल सुनावणार आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा उद्या निकाल देणार असल्याचे सांगतानाच हा निकाल देण्यास उशीर का झाला, याचंही कारण राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद सांगताना राहुल नार्वेकर म्हणाले की, या प्रकरणाचा निकाल देण्यास उशीर झाला आहे, असं वाटत नाही. जवळपास ३४ याचिकांवर सुनावणी सुरू होती. त्यानंतर सुमारे सव्वा दोन लाख पानांची छाननी करायची होती. त्यामुळे निकाल देण्यास एवढा उशीर लागणारच होता, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात प्रलंबित असलेल्या याचिकांवर ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही नार्वेकर यावेळी म्हणाले.
आता राहुल नार्वेकर यांच्याकडून उद्या सुनावण्यात येणाऱ्या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार का? की सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप अवैध ठरवला जाणार आणि दोन्ही गटांमधील कुणीही अपात्र ठरणार नाही, असे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणामध्ये निकाल तोंडावर असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. "न्यायमूर्तीच आरोपीला भेटले, असा हा प्रकार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही अपत्रातेचा खटला दाखल केला आहे आणि असं असताना राहुल नार्वेकर दोनदा त्यांना जाऊन भेटले आहेत. अशा स्थितीत आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करावी?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.