चंद्रपूर - गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला. परंतु वाशी येथेच हा मोर्चा थांबवण्यात सरकारला यश आले. सरकारने जरांगेंच्या मागणीनुसार सगेसोयरे या शब्दाचा उल्लेख करत अधिसूचना काढली. यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या जातील त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. मात्र या अध्यादेशाविरोधात ओबीसी नेत्यांकडून सातत्याने आक्रमक आवाज उचलला जात आहे. त्यात आता चंद्रपूर येथील काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट ७ फेब्रुवारीला सरकारच्या अध्यादेशाविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, ओबीसीत साधारण ३९५ जाती आहेत. त्यात केवळ १७ टक्के आरक्षण आहे. त्यात दिलेले आरक्षण हेदेखील अद्याप कोर्टात आहे. त्यामुळे जर मराठ्यांना ओबीसीतून सर्रासपणे आरक्षण दिले जात असेल तर आमचा त्याला विरोध आहे. मराठ्यांना आरक्षण द्या, त्यांना आमचा विरोध नाही. परंतु मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसीतून आरक्षण देऊ नका. कारण ओबीसीतील आरक्षण आम्हाला पुरेसे नाही. मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्यात यावे असं त्यांनी सांगितले.
तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. जर आरक्षणाला धक्का लागला तर मराठ्यांचे एकवटलेले चित्र महाराष्ट्रात आपण पाहिले तसेच चित्र भविष्यात ओबीसींबाबतीतही घडल्याचं राहणार नाही असा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला. त्याचसोबत चंद्रपूर मतदारसंघ हा दिवंगत बाळू धानोरकर यांचा होता. अख्ख्या महाराष्ट्रात केवळ एकमेव मतदारसंघ काँग्रेसनं राखला. त्यामुळे पक्षाने आदेश दिला नसेल तरी दावेदार म्हणून माझी लोकसभेची तयारी सुरू आहे. मला तिकीट मिळेल असा विश्वास आहे. कारण याठिकाणी दुसरा दावेदार नाही. ही हक्काची जागा आम्ही सोडणार नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे असंही प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलं.
आम्हाला आव्हान दिले तर...
सगेसोयरे अध्यादेशाबाबत होणारा विरोध पाहता मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसींना आव्हान दिले. जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही मंडल आयोगाला आव्हान देऊ शकतो. जर आम्ही आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल. जे आम्हाला करायचे नाही. राजकीय हव्यासापोटी गरीब मुलांचे नुकसान करू नका असे प्रत्युत्तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ‘हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या’, असे म्हणणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले होते.