गेल्या वर्षाच्या मध्यावर राज्याच्या राजकारणात झालेली उलथापालथ आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या सत्तांतरापासून निर्माण झालेला राजकीय वाद आणि आरोप प्रत्यारोपांचे सत्र आता वर्ष उलटत आले तरी कायम आहे. एकीकडे सत्ता आणि पक्ष गमावलेले उद्धव ठाकरेएकनाथ शिंदे आणि भाजपावर बोचरी टीका करत आहेत. तर दुसरीकडे शिंदे आणि भाजपाकडूनही त्यांना तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले जात आहे. दोन्ही बाजूंनी टीकाटिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपांचा फैरी दररोज झाडल्या जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे. मला वरिष्ठांकडून आदेश आल्यास मी या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईन, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच सध्या कोर्टाच्या निकालाबाबतं योग्य नाही, मात्र जे बोलतात, त्यांना सांगतो की, सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर राज्यात मोठी उलथापालथ होणार असून, जे उरले आहे तेही इकडे येतील, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एकीकडे आज राज्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा वाद विकोपाला गेला असताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं आहे.
मात्र चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधला. ते म्हणाले की, आपण म्हणतो की, उद्धव ठाकरे स्वत: काही विचार करत नाहीत. मात्र ते खरं नाही. सांगणारे खूप सांगतील. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर उभं राहून एकदा विचार करायला हवा होता. त्यांनी ठाकरे कुटुंब म्हणून परिणामांचा विचार करायला हवा होता, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.