मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केले आहे. या हल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही कर्नाटक मध्ये गेलो नाही, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
आज बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. याबाबत उपुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधत नाराजी व्यक्त केली आहे. मी देखील कर्नाटक पोलीस महासंचालक यांच्याशी बोललो आहे. दोन गाड्या फोडल्या असून गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. याचबरोबर, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो असून त्यांना वस्तुस्थिती सांगितली आहे. केंद्राने यात मध्यस्ती करावी, असे प्रकार होणे चुकीचे आहे. मला सर्व प्रकारावर लक्ष ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. दरम्यान, 6 तारखेला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली होती. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना बेळगावात न जाण्याची सूचना केल्याने हा दौरा रद्द करण्यात आला होता.