...म्हणून आम्ही तीन हिरो एकत्र येत सरकार बनवलं; अशोक चव्हाणांनी सांगितलं सत्तेचं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 09:34 AM2020-01-27T09:34:23+5:302020-01-27T09:44:02+5:30
त्याचसोबत संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली.
नांदेड - आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्र सारखचं असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे. आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असं वाटत नव्हतं. पण आम्ही एकत्र आलो, हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे, तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचं सरकार आलं असं विधान काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. नांदेडमध्ये एका प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, तीन पक्षाचं तीन विचारांचे सरकार चालणार कसं? हा प्रश्न होताच पण घटनेच्या आधारावर आपलं सरकार चाललं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमच्या दिल्लीच्या वरिष्ठांनी अजिबात परवानगी देणार नाही, संविधानाच्या चौकटीत सरकार चाललं पाहिजे मग मी त्यांना सांगितलं तुम्ही चिंता करु नका, मला २ पक्षाचं सरकार चालवण्याचा अनुभव आहे त्यात आता तिसरा शिवसेना पक्ष सहभागी झाला असं ते म्हणाले.
त्याचसोबत संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली त्यामुळे हे सरकार स्थापन झालं असं अशोक चव्हाणांनी सांगितलं.