ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - भारतीय बँकांना नऊ हजार कोटी रुपये कर्जाचा गुंगारा देत ब्रिटनमध्ये आश्रयास असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या फाऊंडेशनद्वारा आयोजित ‘चॅरिटी डीनर’ला हजेरी लावली होती. यावरुन विराटसहीत अन्य खेळाडूंवरही टीका करण्यात आली.
विजय माल्यावरुन भारतीय क्रिकेटपटूंवर टीका करणा-यांनी सीमारेषेवरील रक्तपात विसरुन भारत-पाकिस्तान मॅच पाहिली, त्याचे त्यांना काही वाटत नाही का?, असे सांगत सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांना झोडून काढले आहे.
""मल्ल्या यांना क्रिकेट सामने बघण्यासाठी स्टेडियमवर जायला लाज वाटायला हवी होती असे जे म्हणतात त्यांच्या परखड मताशी आम्ही सहमत आहोत; पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याचा आनंद लुटणाऱ्या कितीजणांनी हाच परखडपणा दाखविण्याचे धाडस दाखवले? हा सामना पाहणाऱ्यांपैकी किती लोकांना त्यावेळी कश्मीरातील जवानांचा रक्तपात अस्वस्थ करून गेला? असा प्रश्नही उद्धव यांनी उपस्थित केला आहे.
तसंच पाकिस्तानला एकटे पाडायचे असेल तर त्यांच्याशी क्रिकेटच काय, कोणत्याही स्तरावर संबंध ठेवता कामा नयेत, असेही ते म्हणालेत.
दरम्यान, "चॅरिटी डीनर"मध्ये कोहलीसह संपूर्ण भारतीय संघाने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली खरी पण माल्यापासून ‘चार हात दूरच’ राहण्याचा निर्णय घेतला. वाद टाळण्यासाठी माल्या उपस्थित होण्याआधीच भारतीय खेळाडू कार्यक्रमातून निघून गेले.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
सन्माननीय विजयराव मल्ल्या यांचे काय करावे, असा प्रश्न हिंदुस्थान-लंडन वाऱया करणाऱ्या अनेक ‘पेज-3’वाल्यांना पडला आहे. शंभर टक्के ‘पेज-३’वाल्यांनी विजयरावांचे नमक खाल्ले आहे. त्यामुळे नमकहरामी कशी करावी या चिंतेने लंडनवारी करणाऱ्या अनेकांना ग्रासले आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघाचीदेखील अशीच पंचाईत परवा विजयराव मल्ल्या यांनी केली. लंडनच्या एजबस्टन येथे झालेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला विजय मल्ल्या यांनी खास हजेरी लावली. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंबरोबर त्यांची छायाचित्रे झळकली. विजयरावांनी हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावल्यामुळे आपल्याकडे अनेकांनी भुवया उंचावून आश्चर्य व्यक्त केले. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? जे मल्ल्या नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळून गेले त्यांना दिल्लीच्या विमानतळावर कोणी रोखले नाही, मग लंडनच्या भूमीवर क्रिकेट मॅचला जाण्यापासून त्यांना कोणी रोखायचे? दाऊदला पाकिस्तानातून येथे आणण्याचे प्रयत्न पंचविसेक वर्षांपासून सुरू आहेत. यापुढेही ५०० वर्षे हे प्रयत्न अखंड सुरूच राहतील. विजय मल्ल्यांच्या बाबतीत तरी वेगळे काय घडणार आहे? मल्ल्या यांनी क्रिकेट मॅचला हजेरी लावून सगळ्यांना बुचकळ्यात पाडले; पण कर्णधार विराट कोहलीने (त्याच्या संस्थेने) आयोजित केलेल्या एका डिनर सोहळ्यास हजेरी लावून मल्ल्या महाशयांनी
सगळ्यांचीच तारांबळ
उडवली. हिंदुस्थानी क्रिकेट संघाची तर म्हणे अवस्था बिकट झाली. खेळाडू गांगरून गेले व हात ओले न करताच त्यांना तिथून पळ काढावा लागला. कधी काळी ज्या विजयरावांच्या मेजवान्यांना भरपेट हजेरी लावण्याचे भाग्य लाभले होते त्यांच्याच समोर तोंड लपवून पळून जायची वेळ आमच्या खेळाडूंवर यावी? म्हणजे चोर कोण? आमचे खेळाडू की विजय मल्ल्या? विजय मल्ल्या लंडन-युरोपात चकाचक, टकाटक सुटाबुटात, उघड्या चेहऱ्याने व निधड्या छातीने फिरत आहेत आणि आमच्या लोकांना मात्र ते समोर येताच मान खाली खालून पळावे लागत आहे. मल्ल्या हे कालपर्यंत हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे प्रायोजक होते, आय. पी. एल. क्रिकेट स्पर्धेतील एका संघाचे मालक होते. त्यावेळी अनेक क्रिकेटपटूंना त्यांनी बोली लावून ‘विकत’ घेतले होते. आज परिस्थिती बदलली आहे. या पूर्वाश्रमीच्या ‘मालका’चे आगमन झाल्याबरोबर अनेकांची दाणादाण उडत आहे. यास जबाबदार कोण? ज्यांनी मल्ल्या यांना पळून जाऊ दिले ते या परिस्थितीस जबाबदार आहेत. मल्ल्या यांना क्रिकेट सामने बघण्यासाठी स्टेडियमवर जायला लाज वाटायला हवी होती असे जे म्हणतात त्यांच्या परखड मताशी आम्ही सहमत आहोत; पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याचा आनंद लुटणाऱ्या कितीजणांनी हाच परखडपणा दाखविण्याचे धाडस दाखवले? हा सामना पाहणाऱ्यांपैकी किती लोकांना त्यावेळी
कश्मीरातील जवानांचा रक्तपात
अस्वस्थ करून गेला? ‘‘क्रिकेटच्या मैदानावर पाकडय़ांना पराभूत केले; वचपा काढला’’ वगैरे वीरश्रीयुक्त भाषणे ठीक आहेत; पण पाकिस्तानला एकटे पाडायचे असेल तर त्यांच्याशी क्रिकेटच काय, कोणत्याही स्तरावर संबंध ठेवता कामा नयेत. ज्यांना विजय मल्ल्यांच्या आगाऊपणाचा संताप येतोय त्यांना पाकड्यांबरोबरच्या खेळाचाही संताप यायला हवा. मल्ल्या यांनी हिंदुस्थानी बँकांचे नऊ हजार कोटी बुडवून लंडनला पलायन केले तेव्हा आमचे सरकार व इतर गुप्तचर, तपास यंत्रणा झोपल्या होत्या काय? मल्ल्या यांना लंडनमध्ये अटक झाल्याच्या वावटळी उठल्या तेव्हा ‘किंगफिशर’ बीअरची एक बाटली संपायच्या आत हे महाशय लंडनच्या पोलीस स्टेशनातून जामीन घेऊन बाहेर पडले होते. त्यामुळे अनेकांच्या देशाभिमानाने फुगलेल्या फुग्यातील हवादेखील लगेच निघाली होती. विजय मल्ल्या हे या देशाचे आर्थिक गुन्हेगार आहेतच. त्यामुळे त्यांच्याबद्दल संताप येणे किंवा सध्या क्रिकेट स्टेडियमवर ते लावीत असलेली हजेरी खटकणे यात गैर काहीच नाही. मात्र मल्ल्यांच्याच ‘किंगफिशर’चे मग हातात घेऊन पाकडय़ांबरोबरचे सामने ‘चिअर्स’ करणाऱ्यांचे काय? त्यांच्या माना ज्या दिवशी लाजेने खाली झुकतील त्याच दिवशी देशभक्तीचा खरा अंकुर हिंदुस्थानात फुटेल. तेव्हा आधी स्वतःच्या पायाखाली काय जळते आहे तेदेखील पहा. उगाच त्या बिचाऱ्या खेळाडूंनाच दोष का देता?