मुंबई - पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. पवार यांच्या कन्या खा.सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यसभा सदस्य असलेले आणि शरद पवार यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध असलेले प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची ही चर्चा आहे. याशिवाय सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
केंद्रीय राजकारणाचा आवाका असलेले नेते म्हणून पटेल यांच्याकडे बघितले जाते. पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांशी त्यांचे सारखेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी आणि सर्व पक्ष नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. अध्यक्षपद कुटुंबातच ठेवायचे अशी भूमिका ठरली तर सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. शेवटी राष्ट्रवादीची ओळख पवार यांचा पक्ष अशी आहे. सुप्रिया सुळे ही ओळख पुढे नेऊ शकतात. केंद्रीय राजकारणाचा तसेच संसदीय कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रीय राजकारणातील वारसदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. अजित पवार यांच्याकडे राज्यातील राजकारणाचे वारसदार म्हणून बघितले जाते. सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्षपद दिले तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना तसेच काँग्रेसकडूनही विरोध होण्याची शक्यता नाही.
अजित पवार यांना राष्ट्रीय राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही. त्यांनी नेहमीच महाराष्ट्रात राजकारण करणे पसंत केले आहे. राष्ट्रीय राजकारणातील घडामोडीवर त्यांची प्रतिक्रिया विचारली की ते नेहमीच मी महाराष्ट्राचे बघतो, दिल्लीचे काय ते मला माहिती नाही असे सांगतात.