पुणे: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरीही धोका कायम आहे. तरीही अनेक जण बेजबाबदारपणे वागत आहेत. स्वत:ला जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधीदेखील यात मागे नाहीत. याचा प्रत्यय भारतीय जनता पक्षाचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात आला. या समारंभात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला. लग्नाला उपस्थित असलेल्या अनेक मोठ्या नेत्यांनी मास्कदेखील घातले नसल्याचं फोटोत दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना 'दो गज की दुरी' राखण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन करत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी मास्कशिवाय सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता राज्यातले भाजप नेते लग्न समारंभात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करताना दिसले. पुण्यात संपन्न झालेल्या राम सातपुतेंच्या सोहळ्याला ५०० हून अधिक जणांची उपस्थिती होती. यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता.
भाजप आमदाराच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क
By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 9:22 AM