पुणे : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवाराप्रमाणेच राज्य निवडणूक आयोगालादेखील सोशल मीडियाची भुरळ पडली आहे. निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जनजागृती मोहिमेसाठी पोस्टर, व्हिडिओ क्लिप, सोशल मीडिया, पथनाट्याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली. नागरिक मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन सहलीला जातात. मी मत नाही दिले तर काय होणार आहे. माझा मताने असा काय फरक पडणार.. सगळे सारखेच... कुणाला मतदान करायचे...मतदान करण्यासाठी रांगेत कोण उभे राहणार.. मतदान केंद्र घरापासून लांब आहे... अशा विविध कारणामुळे काही नागरिक मतदान करत नाही. यामुळे निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का घरसरत चालला आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान जनजागृती मोहिम राबविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मतदानाचा हक्क बजावा, मतदान श्रेष्ठ दान, मी मतदान करणार, तुम्ही ही करा, मतदान करणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. अशा विविध घोषवाक्यांची जवळपास पाच लाख पत्रके वाटण्याचे नियोजन केले आहे. याप्रमाणेच मतदान जनजागृतीची १४४ मोठी होर्डिंगद्वारे विविध भागामध्ये लावली आहेत. जिल्ह्यातील १ हजार १५० खासगी केबलच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक घराघरामध्ये मतदान जनजागृती केली जात आहे. चित्रपटगृहात जिल्हाधिकारी सौरभ राव यांची मतदान करण्यासंदर्भातील क्लिप दाखविली जात आहे. (प्रतिनिधी)
सोशल मीडियाची भुरळ आयोगालाही
By admin | Published: February 11, 2017 2:46 AM