लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोशल मीडियाचे अस्त्र आता भाजपावर उलटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता सोशल मीडियाबाबत कठोर कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला.सोशल मीडियावर सरकारविरोधी आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राज्यातील अनेक तरुणांना पोलिसांकरवी नोटिसा पाठविण्यात येत आहेत. या संदर्भात वृत्तवाहिन्यांशी बोलताना संजय राऊत म्हणालेकी, सोशल मीडियाद्वारे लोकांचीमने कलुषित करून भाजपा सत्तेवर आली. आता हेच अस्त्र त्यांच्यावर उलटले आहे. त्यामुळे सोशल मीडियाबाबत कठोर कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले. देशात तालिबानी राजवट येत आहे का, असा सवाल करतानाच, सायबर सेलचे अधिकारी हे भाजपाचे एजंट असल्याचा आरोपही त्यांनी केला.गुरदासपूर आणि केरळमधील पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. या पराभवाचा मला आनंद नाही. मात्र, देशातील जनमत बदलत असल्याचे या निकालावरून दिसते आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची धमकी देत, भाजपा आता मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांवर दबाव टाकू शकत नाही. लोकांनी पाच वर्षांसाठी आम्हाला निवडून दिले याचे भान आम्हाला आहे, असेही राऊत म्हणाले.सोशल मीडियावरील लिखाणावरून नोटीस पाठविल्याप्रकरणी यापूर्वी शरद पवार आणि राज ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली होती. सरकारच्या विरोधात मते मांडणाºया तरुणांची सरकार पोलिसांच्या माध्यमातून गळचेपी करीत असून, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून नाहक त्रास दिला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता.
सोशल मीडियाबाबत कायदा आणण्याचा डाव, संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 4:25 AM