पेठ : लग्न पाहावे करून अशी म्हण रूढ आहे. लग्न जमविणे आणि ते पार पाडणे एक दिव्यच असते. पूर्वीच्या काळी लग्न जुळविण्यासाठी गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात असे. परंतु आता बदलत्या काळात लग्नाची जुळवाजुळव ही व्हॉट्स अॅप, तसेच फेसबुकसारख्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने होऊ लागली आहे. सोशल मीडियाचा हा विधायक वापर तरुणवर्ग करू लागला असल्याने जुनी-जाणती वृद्ध मंडळीदेखील यात आनंदाने सहभाग घेत आहेत.सध्याच्या काळात लग्न जुळविणाऱ्या अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. अनेक सामाजिक मंडळेही यात पुढाकार घेतात. यासाठी मेट्रोमोनियल साईट्सचादेखील वापर केला जातो. इच्छुक वधू-वरांची माहिती या मंडळांकडून, सामाजिक संस्थेकडून पोहोचवली जाते. त्यामुळे वधू-वर मंडळांना चांगले दिवस आले आहेत. तरीही आता पुढची आधुनिक पिढी तंत्रज्ञानात आघाडीवर आहे. नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाचा आपल्या आयुष्यात कसा वापर करून घ्यायचा, याबाबतीत तरुणवर्ग जागरूक आहे. या तरुणांकडून व्हॉट्स अॅपवर कुमकुम भाग्य, रेशीमगाठी असे ग्रुप तयार करून या ग्रुपद्वारे वधू-वरांची माहिती आदान-प्रदान केली जात आहे.व्हॉट्स अॅपमुळे दोन्ही मुला-मुलींचे परिचयपत्रक व फोटो पाठविल्याने दोन्ही कुटुंबांना ही माहिती तत्काळ मिळते. त्यामुळे लग्न जमविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे दिसून येत आहे. मित्रांना तसेच ज्या कुटुंबांना विवाह सोहळ्यासाठी निमंत्रण द्यावयाचे आहे ते विविध व्हॉट्स अॅप ग्रुपवर लग्नपत्रिका टाकून निमंत्रण दिले जात आहे. सोशल मीडियाचा समाज माध्यमांचा हा सकारात्मक वापर तरुणांनी स्वीकारला आहे. यातून वेळ, पैसा यांची बचत होत असून एकमेकांची माहिती तत्काळ पोहोचवली जात आहे. त्यातच आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आकर्षक जाहिरात बनवून ती फोटोसह पाठविणे शक्य झाल्याने निमंत्रण आणि इतर अनेक कार्यक्रमांसाठी अशा प्रकारच्या माध्यमांचा वापर होऊ लागला आहे.
लग्नाच्या गाठी जुळविण्यासाठी साकडं सोशल मीडियाला!
By admin | Published: January 05, 2017 3:27 AM