मुंबई: माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. संभाजी भिडेंनी सांगितलेल्या 'आम्र'सूत्राची सोशल मीडियावर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. तर काहींनी या हास्यास्पद विधानाची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली आहे. रविवारी संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली. यावेळी भिडे यांनी म्हटले की, माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही बाब फक्त आईलाच सांगितली होती. आता तुम्हाला सांगत असल्याचे भिडे यांनी सभेत म्हटले. संभाजी भिडेंच्या या अजब विधानामुळे सोशल मीडियावर बनवाबनवी चित्रपट चर्चेत आला आहे. बनवाबनवीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दुहेरी भूमिका साकारली आहे. यापैकी एक स्त्री व्यक्तीरेखा आहे. पारु असं या व्यक्तीरेखाचं नाव आहे. पारुला त्यांच्या घरमालकीणबाई एक आंबा देतात. हा आंबा त्यांना निरंजनबाबानं दिलेला असतो. हा आंबा खाल्ल्यानं पारुला दिवस जातात, असा एक प्रसंग चित्रपटात आहे. पारुला दिवस जाताच, 'काय पार्वती, निरंजनबाबांचा आंबा पावला की नाही?,' असं लाडानं म्हणतात. संभाजी भिडेंच्या आंब्यावरील विधानानं अनेकांना बनवाबनवी चित्रपटातील याच प्रसंगाची आठवण होत आहे.
...म्हणून संभाजी भिडेंच्या 'आम्र'सूत्रामुळे लोकांना आठवतोय बनवाबनवीतला 'हा' प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 6:49 PM