- असीफ कुरणेकोल्हापूर : लोकसभा निवडणुका येऊ लागल्याने सोशल मीडियावरील प्रचाराचा धुरळा जोरात उडू लागला आहे. राफेल घोटाळ्याच्या ‘व्हिडिओ वॉर’नंतर आता ‘आझादी’ या नव्या व्हिडिओवरून काँग्रेस व भाजपा सोशल मीडियावर हातघाईवर आले आहेत.‘गल्ली बॉय’ या चित्रपटातील एका रॅप गाण्याचा विडंबन व्हिडिओ तयार करून काँग्रेस व भाजपा एकमेकांवर टीका करत आहेत. २०१६ मध्ये जेएनयू विद्यापीठ वादावेळी डब शर्मा याने ओरिजनल रॅप साँग तयार केले होते. त्याचे ‘विडंबन रॅप साँग’ सोशल मीडियावर भलतेच व्हायरल झाले आहे. दोन्ही पक्षांनी या विडंबनाचा व्हिडिओ टिष्ट्वटरवर शेअर केला. त्यावेळपासून काँग्रेसचा ‘डर के आगे आझादी’चा व्हिडिओ १ लाख २० हजारवेळा, तर भाजपचा ‘काँग्रेस से आझादी’ व्हिडिओ ७६ हजारवेळा पाहिला गेला. व्हॉटस्अॅपवरही हे दोन्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.काँग्रेसच्या व्हिडिओमध्ये सामाजिक असहिष्णुता, राफेल भ्रष्टाचार, बड्या उद्योजकांसोबत पंतप्रधानांचे संबंध, मॉब लिंचिंग, नोटाबंदी, वाढती बेरोजगारी, दलित अत्याचाराबाबत भाजप सरकारवर टीका करण्यात आली आहे. भाजपाने टू-जी घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, रॉबर्ट वाड्रा प्रकरण, काँग्रेसमधील घराणेशाही आदी विषयांवरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. दोन्ही पक्षांनी आपल्याला अडचणीची ठरतील, अशी वाक्ये मात्र सोयीस्कररित्या टाळली आहेत. राफेल वादावरूनही काँग्रेस व भाजपाने एकमेकांवर टीका करणारे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केले होते. भाजपाने राफेलचा व्यवहार समजावून सांगण्यासाठी कुलूप खरेदी करण्याचे उदाहरण देणारा व्हिडिओ बनविला. त्याला काँग्रेसने तसेच प्रत्युत्तर दिले होते. जेएनयू विद्यापीठातील ‘आझादी’च्या घोषणेवरून कन्हैयाकुमार विरोधात रान उठविणाऱ्या भाजपाने यावेळी मात्र त्यांच्याच घोषणाचा वापर असलेल्या ‘रॅप साँग’चा वापर करून काँग्रेसवर टीका केली आहे.
काँग्रेस व भाजपात ‘सोशल मीडिया वॉर’, विडंबन व्हिडिओंची धूम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 5:19 AM