ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - फेसबुक या सोशल मीडियावर मजकूर टाकून बदनामी करणा-यांविरोधात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि. १) कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. परंतू दोन दिवसानंतरही त्या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.
सारंग रामटेके, छत्रपती करडभाजने अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी १५ ते १६ मार्चदरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची व त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करणारा मजकूर फेसबुकवर टाकला. सोशल मीडियावरून अशाप्रकारे बदनामी होत असल्याबाबत बावनकुळे यांच्या काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत लगेच पालकमंत्री बावनकुळे यांना कार्यकर्त्यांनी सांगितले. त्याची दखल घेत बावनकुळे यांनी शनिवारी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३५४, ५००, ५०४, ५०१, ३५ व माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला.
ही तक्रार दाखल झाल्यानंतर कोराडी पोलीस लगेच कामाला लागले. मात्र दोन दिवस लोटूनही आरोपींना पकडण्यात कोराडी पोलिसांना यश आलेले नाही. ‘ते दोघे कोराडीऐवजी बाहेर ठिकाणचे रहिवासी असावेत’ असा पोलिसांनी आता तर्क लावला आहे. दुसरीकडे आरोपींपैकी सारंग रामटेके हा कुहीचा तर छत्रपाल करडभाजने हा भूगाव, ता. कामठी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांवर अकार्यक्षमतेचा ठपका
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बदनामी करणारा मजकूर फेसबुकवर साधारणत: १५ दिवसांपूर्वी टाकला. याबाबत दोन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी रीतसर तक्रारही केली. मात्र आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले नाही. दुसरीकडे आरोपी हे कोराडीबाहेरील असल्याचे कोराडी पोलीस सांगत सुटले आहे. त्यातच आता एक आरोपी कुही आणि दुसरा हा भूगाव येथील असल्याचे समोर आलेले आहे, तरीही पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही. एरवी तत्परता दाखविणारे कोराडी पोलीस यावेळी का बरे दिरंगाई करीत आहे. दोन दिवसानंतरही आरोपींपर्यंत का पोहोचू शकले नाही, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होऊ लागली आहे.