औरंगाबाद : राज्यातील ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना’ लागू करण्यात आली आहे. राज्यात सुमारे १०१ सहकारी क्षेत्रातील व ८७ खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये अंदाज आठ लाख ऊसतोड कामगार काम करतात. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ होणार आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी राष्टÑसंत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव येथे दसरा मेळाव्यात तशी घोषणा केली होती. २४ तासांत तसा शासननिर्णय जारी झाला आहे. केंद्र शासनाच्या असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ अंतर्गत विशिष्ट योजनांचा लाभ देण्याकरिता महाराष्टÑातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता ही योजना लागू करण्यातआली आहे. या योजनेंतर्गत प्राथमिक टप्प्यामध्ये विविध प्रशासकीय विभागांच्या अंतर्गत सुरू असलेल्या घर बांधणी, वृद्धाश्रम व शैक्षणिक योजनांकरिता संबंधित प्रशासकीय विभागांनी ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. घरबांधणी योजनेमध्ये इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई नागरी/ग्रामीण आवास योजना इ. योजनांचा प्रथम टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. शैक्षणिक योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जातीकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या वृद्धाश्रम योजनेच्या निकषाप्रमाणे देखील लाभ घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याशिवाय ऊसतोड कामगारांसाठी सद्य:स्थितीत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, अंत्यविधी अर्थसहाय योजना, जीवन व अपंगत्व विमा छत्र, आरोग्य व प्रसूती लाभ, वृद्धदपकालीन संरक्षण, केंद्र शासन निर्धारित करेल असे इतर लाभ, भविष्य निर्वाह निधी, कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास अर्थसहाय योजन, पाल्यांसाठी शिक्षण, हॉस्टेल फी परतावा व शिष्यवृत्ती सहाय, कामगार कौशल्यवृद्धी योजना, अंत्यविधी अर्थसहाय योजना, वरील लाक्षणिक योजनांव्यतिरिक्त शासनास वेळोवेळी व गरजेनुसार उपयुक्त वाटणाºया योजना प्रस्तावित असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी योजनेकरिता वित्त विभाग व नियोजन विभागाच्या सहमतीने प्रथम टप्प्यामध्ये योजना सुरू करण्यासाठी २० कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 7:47 AM