मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात केंद्रीय निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टात लढाई सुरू होती. त्यात नुकतेच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह वापरण्यास मज्जाव केल्यानंतर आता ठाकरे गटाकडून त्यांच्या ट्विटर हँडलवर नाव बदलण्यात आले आहे. शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या घडामोडीबाबत अपडेट देणाऱ्या शिवसेना या अधिकृत ट्विटर हँडलचे नाव आता शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे असं करण्यात आले आहे. त्यामुळे ट्विटरवरून पक्षाचे Blue Tick गायब झाले आहे. तर शिवसेनेची वेबसाईटही बंद झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर सोशल स्ट्राईक आला आहे.
उद्धव ठाकरेंनी खेळली नवी खेळीपक्षाचे नाव आणि चिन्ह जाणार याची कुणकुण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांना आधीच लागली होती. शिवसेनेच्या पक्षनिधीवरही शिंदे गटाकडून दावा केला जाऊ शकतो, हे ओळखून पक्षनिधीची रक्कम अन्य बँक खात्यात वळविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा पक्षनिधी सुमारे १५० कोटींचा असण्याची शक्यता आहे.
शिवसेना भवन ठाकरेंच्या ताब्यातशिवसेना पक्ष शिंदे गटाला मिळाला असला तरी दादरचे शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. शिवसेना भवनवर शिवाई ट्रस्टची मालकी आहे. या ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे जुने-जाणते नेते ॲड. लीलाधर डाके आहेत. त्याचप्रमाणे ठाकरे कुटुंबातील सदस्यांचाही ट्रस्टमध्ये समावेश आहे. संघर्ष उद्भवणार आहे तो शिवसेना शाखांचा; कारण बहुतांश शाखा त्या विभागातील नेतृत्व म्हणजे विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार यांनी उभारलेल्या आहेत. या जागांचे रजिस्ट्रेशनही त्यांच्याच नावावर असल्याने ते कोणत्या गटात आहेत, त्यानुसार या शाखांच्या मालकीचा संघर्ष उद्भवू शकतो.