ऑनलाइन लोकमत
सावंतवाडी, दि. 13- जेष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं आज सावंतवाडी येथे निधन झालं .ते 72 वर्षांचे होते. गोपाळ दुखंडे यांच्या पश्यात त्यांची पत्नी उर्मिला, मुलगी सोनाली आणि दोन मुलं संतोष आणि संदीप असा त्यांचं कुटुंब आहे. दुखंडे यांच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीतील एक झंझावात शांत झाल्याची भावना व्यक्त होते आहे. त्यांचे पार्थिव आज रात्री मुंबईत आणलं जाईल आणि मंगळवारी सकाळी गोरेगावच्या सिद्धार्थ नगरमधील त्यांच्या घरा पासून अंत्ययात्रा निघणार आहे.
प्राध्याप गोपाळ दुखंडे यांचे वडील गिरणी कामगार होते, लहानपणापासून संघर्ष करत गोपाळ दुखंडे यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमधील शिक्षण सुरू असताना ते जनता दल, छात्रभारती आणि इतर सामाजिक,राजकीय कामं करीत होते. युक्रांद या युवक चळवळीमधून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. गोपाळ दुखंडे यांना कोकणाविषयी आस्था होती त्यामुळेच परळच्या दामोदर हॉलच्या पटांगणात त्यांनी कोकणी बाजार पेठ भरविली होती. कोकण रेल्वे येण्याकरीता झालेल्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. कोकणातील मुलाला कोकण रेल्वेमध्ये नोकरी मिळावी यासाठी त्यांनी "कोकण रेल्वे जनाधिकार समिती"ची स्थापना केली होती. मालवण विधान सभा मतदार संघातून त्यांनी 1995 साली नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. मुंबई विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा याचा ते प्रत्येक सभेत आग्रह धरत होते. कोकणामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे याचा त्यांनी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आग्रह धरला आणि रत्नागिरी येथे ते उपकेंद्र मंजूर करून घेतले. छात्रभारतीच्या मुंबईच्या कामात त्यांनी पहिल्यापासून लक्ष घातलं होतं. कपिल पाटील,शरद कदम या त्यावेळच्या विद्यार्थी नेत्याना हाताशी धरून त्यांनी अनेक आंदोलने उभी केली.
रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा छात्र भारतीने काढलेला रात्रीचा पहिला बॅटरी मोर्चा,त्यावेळचे महापालिका उपायुक्त गो. रा.खैरनार यांना घेऊन रुईया कॉलेजच्या नाक्यावर कुलगुरू डॉ.कर्णिक यांच्या विरोधात केलेले आंदोलन,गिरणी कामगारांच्या लढाईत दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वा खाली काढलेला चड्डी,बनियान मोर्चा, भारतमाता सिनेमा वाचविण्यासाठी झालेले आंदोलन,नामांतर लढा,मंडल आयोग स्थापन करण्यासाठी झालेल्या प्रत्येक लढाईत प्राध्यापक दुखंडे पुढे असत. काही वर्षा पूर्वी ते सावंतवाडीत स्थायिक झाले होते.