रत्नागिरी : जगदगुरू नरेंद्राचार्याजी महाराजांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत ५६ हजारांपेक्षा अधिक लोक मरणोत्तर देहदानाला तयार होतात, ही साधी गोष्ट नाही. हा महान त्याग असून यापेक्षा मोठा चमत्कार असूच शकत नाही. जेव्हा समाज आणि धर्माचार्य अशा कामामध्ये उभे राहतात तेव्हा मोठी क्रांती होते, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त तालुक्यातील नाणीजधाम येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री रवींद्र वायकर, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विनायक राऊत, खासदार नानाभाऊ पटोले, आमदार उदय सामंत, राजन साळवी, संजय कदम व सदानंद चव्हाण, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार विनय नातू, सूर्यकांत दळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर व्यासपीठावर उपस्थित होते.माणूस जिवंतपणी आपल्यासाठी जगतो. मरणानंतरही दुसऱ्याला काही देत नाही. पण या संकल्पामुळे मरणानंतरही आपला देह दुसऱ्याच्या उपयोगी आणता येतो. दरवर्षी पाच लाख अवयवांची गरज असते. गतवर्षी देहदानाचे प्रमाण केवळ .००८ टक्के एवढे होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील हा देहदान उपक्रम देशातच नव्हे तर जगातील सर्वात मोठा उपक्रम असावा, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानाने गेल्या अनेक वर्षात राज्यात व राज्याबाहेर केलेल्या विविध समाजापयोगी उपक्रमांबाबत माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. तब्बल ५६ हजारांहून अधिक लोकांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संकल्प केल्यानंतर दिवंगत झालेल्या तीन लोकांचे देहदान करण्यातही आले आहे. या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांचा मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)जेव्हा जेव्हा राजसत्ता भ्रष्ट झाली, तेव्हा तेव्हा धर्मसत्तेनेच त्यांना मार्गावर आणले आहे. धर्मसत्तेमुळेच सुसंस्कारित समाज घडला आहे. जगदगुरू नरेंद्राचार्य अर्थात धर्माचार्य यांच्या माध्यमातून चांगला समाज घडतो आहे. कोणताही जातीभेद न ठेवता आपण जगायचे आणि इतरांनाही जगवायचे हे ईश्वरीय कार्य आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
समाज, धर्माचार्य एकतेने क्रांती
By admin | Published: October 16, 2016 2:00 AM