सीमा महांगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमातून २५ टक्के पाठ्यक्रम कपात करण्याचे जाहीर झाले. त्यात इयत्ता बारावीच्या समाजशास्त्र विषयातील ‘शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी’ हा धडा वगळण्यात आला. तो ‘भारतातील सामाजिक समस्या’ या पाठात समाविष्ट होता. तसेच ‘भारतातील सामाजिक चळवळी’ पाठातून कामगार चळवळींच्या संघटित प्रयत्नाचा आशयही कमी करण्यात आला आहे.दहावीच्या इतिहास विषयात ‘कला, क्रीडा, साहित्य क्षेत्र व इतिहास’ या पाचव्या प्रकरणातील भारतीय कलांचा इतिहास हा धडा वगळण्यात आला आहे. तर राज्यशास्त्राच्या सहाव्या प्रकरणातील ‘भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ हा धडा कमी करण्यात आला आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे आॅनलाइन वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने २५ टक्के अभ्यासक्रम कपात करताना लोकशाही मूल्ये का वगळली, असा सवाल आता काही तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.विज्ञान शाखेमध्ये ज्या ज्या प्रात्यक्षिकांमध्ये जीव विच्छेदनाची प्रक्रिया समाविष्ट आहे, ती प्रात्यक्षिके घेतली जाऊ नयेत, असे निर्देश दिले आहेत. जीवशास्त्राची प्रात्यक्षिके करताना एकच सूक्ष्मदर्शक अनेक विद्यार्थी वापरतात. त्यामुळे अशी प्रात्यक्षिकेही होणार नाहीत. अर्थातच सीबीएसईच्या प्रात्यक्षिक गुणांच्या पद्धतीप्रमाणेच राज्य मंडळाची गुणपद्धत असेल. अकरावी-बारावीच्या वर्षातील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या एकूण प्रात्यक्षिकांपैकी ६० टक्केच प्रात्यक्षिके शिक्षकांकडून घेतली जावीत असे एससीईआरटीने सूचित केले आहे.२५ टक्के भार कोणाचा होणार कमी?प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे एकूण अभ्यासक्रमातील वगळलेला २५ टक्के भाग आता शिक्षकांना शिकवावा लागणार नाही. मात्र त्यातील बराचसा भाग विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी दिला आहे. कमी केलेल्या भागावर प्रश्न विचारण्यात येणार नाहीत. मात्र स्वअध्ययन म्हणून दिलेला पाठ्यक्रमाचा भाग परीक्षा व मूल्यमापनासाठी असणार की नाही, याबाबत बऱ्याच विषयांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.
समाजशास्त्रातील शेतकरी आत्महत्या प्रकरण वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 5:42 AM