ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोपीकृष्ण गुरुप्रसाद असे मृत तरुणाचे नाव असून, तो आंध्रप्रदेशच्या क्रृष्णा जिल्ह्याचा निवासी आहे. हा तरुण विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये रहात होता.
त्याने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवले. पुणे पोलिसांना त्याच्या हॉटेलच्या खोलीमध्ये एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये त्याने आयटी क्षेत्रात नोकरीची हमी देता येत नाही. आयटीमध्ये नोकरी सुरक्षित नसनू, मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटत आहे असे त्याने चिठ्ठीत लिहीले होते. गोपीकृष्णच्या पश्चात आई-वडील आणि बहिण असा परिवार आहे.
आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जयसिंगकर म्हणाले की, पीटनी बोवस् या कंपनीत गोपीकृष्ण 9 जुलैपासून रुजू झाला होता. कंपनीने त्याच्या रहाण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली होती. बुधवारी मध्यरात्री 1.40 च्या सुमारास त्याने सहाव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या केली.
आणखी वाचा
गोपीकृष्ण जमिनीवर कोसळल्यानंतर हॉटेलमधल्या दोन सुरक्षारक्षकांनी त्या दिशेने धाव घेतली आणि हॉटेलच्या मॅनेजरला तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती दिली. हॉटेलच्या मॅनेजरने पोलिसांना कळवले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गोपीकृष्णला मृत घोषित केले.
आम्हाला मृत तरुणाच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने आयटी क्षेत्रात नोकरीची कुठलीही सुरक्षितता नाही. मला माझ्या कुटुंबाची चिंता वाटते असे लिहीले होते. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल. पुण्यात येण्याआधी गोपीकृष्णने दिल्ली, हैदराबाद या शहरातही नोकरी केली होती. पोलीस कंपनीतील सहकारी आणि कुटुंबियांशी चर्चा करुन अधिक माहिती गोळा करत आहेत.
पुण्यात आयटी क्षेत्रात आज अनेक मोठया कंपन्या असून, मोठया प्रमाणावर युवा वर्ग तिथे नोकरी करतो. आयटी क्षेत्रात नोक-यांची कपात होण्याची शक्यता असल्याने काही जणांच्या मनात आपली नोकरी राहिल कि, नाही याबद्दल धाकधूक आहे. त्यातून आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.