सोलापूर : दिव्यांग हे सर्वसामान्यांसारखे चालू, बोलू, पाहू शकत नसले तरी त्यांचा आत्मविश्वास मात्र सर्वसामान्यांपेक्षा जास्त असतो़ यामुळे या आत्मविश्वासाच्या जोरावरच राज्यभरातील जवळपास ४१ दिव्यांगांनी सर्वांत उंच शिखर कळसूबाई सर करत नववर्षाचे स्वागत केले़ यामध्ये सोलापुरातील दिव्यांग विद्यार्थी सोमनाथ धुळे यानेही सहभाग घेतला होता.
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्यभरातील ४१ दिव्यांगांच्या टीमने सर्वोच्च कळसूबाई शिखर सर केले़ शिवुर्जा प्रतिष्ठान, औरंगाबादतर्फे राज्यभरातील दिव्यांगांसाठी कळसूबाई शिखर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मागील आठ वर्षांपासून शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आयोजित करण्यात येते़ यामध्ये सोलापुरातील दिव्यांग विद्यार्थी सोमनाथ धुळे हाही सहभागी झाला होता.
या टीमने ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी शिखरावर चढाईस सुरुवात केली़ कडाक्याच्या थंडीत व सोसाट्याच्या वाºयात ही मोहीम सुरू होती.
वन विभागाने शिखरावर मुक्काम करण्यास बंदी आणल्याने सर्व टीमने शिखर वाटेतच अर्ध्या टप्प्यावर तंबूत मुक्काम ठोकला आणि १ जानेवारी रोजी पहाटे अंधारातच चढाईस सुरुवात केली. पहाटे साडेचार वाजता सुरुवात केल्यानंतर अनेक अवघड चढ-उतार व शिड्या पार करत ठीक साडेसहा वाजता विनाअपघात दिव्यांगांनी कळसूबाई शिखर सर केले.
या मोहिमेत औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, मुंबई, धुळे, जळगाव, सांगली, बुलडाणा आदी शहरांतील दिव्यांगांसोबत सोलापूरचा दिव्यांग सोमनाथ धुळे यांनी सहभाग घेतला़ या दिव्यांगांना गिर्यारोहक नामदेव बांडे, दुर्गप्रेमी विष्णू ससाने, अनिल राऊत व राजेंद्र केरे यांनी मदत केली.या मोहिमेसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या अपंग हक्क विकास मंचतर्फे विशेष साहाय्य करण्यात आले.
राज्यभरातून ४१ दिव्यांगांचा सहभाग- शिवुर्जा प्रतिष्ठान ही संस्था राज्यातील दिव्यांगांसाठी वर्षभर गडकिल्ल्यांचे संवर्धन व भटकंती मोहिमांचे आयोजन करते़ स्वत: शिवाजी गाडे हे पोलिओग्रस्त असून, त्यांनी आतापर्यंत ११५ गडकिल्ल्यांची भटकंती व आठ वेळेस कळसूबाई शिखर सर केले आहे. कालच्या ऊर्जा मोहिमेत राज्यभरातून ४१ दिव्यांग व मदतनीस सहभागी झाले होते.
मला सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती कळाली़ मी संस्थेशी संपर्क साधला. त्यानंतर मी सर्वांसोबत कळसूबाईचे शिखर आम्ही सर केले़ आम्हाला विश्व काबीज केल्यासारखे वाटले़ हे शिखर सर केल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे़ यापुढेही आम्ही सहभागी होऊ़ -सोमनाथ धुळे, गिर्यारोहक
२००५ पासून या संस्थेच्या वतीने मोहिमेचे आयोजन करण्यात येते़ अपंगांना गडकिल्ले प्रत्यक्ष पाहण्याचा आणि चढाई करण्याचा आनंद मिळवून देतो़ अपंगांमध्ये जे जिद्द असते त्याला प्रेरणा देऊन ऊर्जा मिळवण्याचे कार्य या संस्थेकडून करण्यात येते़ -शिवाजी गाडे, अध्यक्ष शिवुर्जा प्रतिष्ठान, औरंगाबाद