- ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 27 - महापालिकेची मुलांची मराठी केंद्रशाळा क्र. २१ सी ही तळीरामांचा अड्डा बनल्यामुळे शिक्षक हवालदिल झाल्याच्या वृत्ताची महापालिका आयुक्त विजयकुमार काळम यांनी दखल घेत शाळेच्या सुरक्षेसाठी तातडीने १६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
‘मनपाची शाळा बनली तळीरामांचा अड्डा’ या मथळ्याखाली २७ जुलै रोजी हॅलो सोलापूर लोकमतमध्ये मनपाच्या २१ नंबर शाळेतील स्थितीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. कस्तुरबा मंडईसमोर मनपाच्या मुलांची मराठी केंद्रशाळा क्र. २१ आहे. याला लागूनच मुलींची मराठी शाळा क्र. १६ सी आणि प्रशाला क्र. २ या शाळा आहेत. या तिन्ही शाळांमध्ये बालवाडी ते दहावीपर्यंतचे जवळजवळ अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी मुकुंदनगर, बागलेवस्ती, सम्राट चौक, वीर फकिरा चौक, बुधवारपेठ या परिसरातील आहेत. मनपाच्या सहा माध्यमिक शाळांमध्ये या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के आहे. शाळेला मोठे मैदान आहे, पण सुविधा नाहीत. बाजूलाच मनपाच्या आरोग्य विभागाचे कार्यालय असताना शाळेच्या परिसरात प्रचंड घाण केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी घाणीबाबत तक्रार केल्यावर विभागीय अधिकारी मोहन कांबळे यांनी सफाई अधीक्षक जोगधनकर यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविली होती. त्यावेळी त्यांना शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळला. तळीरामांनी शाळेच्या पोर्चमध्ये अनेक ठिकाणी बाटल्या फोडल्यामुळे विद्यार्थ्यांना फिरता येणे मुश्कील झाल्याचे दिसून आले. परिसरातील तळीरामांचा रात्री या शाळेच्या इमारतीवर अंमल असतो, अशी तक्रार मुख्याध्यापक चंद्रकांत मोटे यांनी दिली. या स्थितीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर आयुक्त काळम यांनी त्यांच्या अधिकारात शाळेच्या सुरक्षेसाठी १६ लाखांचा निधी मंजूर केला. यातून तातडीने सीसी कॅमेरे, परिसरात दिवे, कुंपणाची दुरुस्ती, स्वच्छतागृह व बंद करण्यात आलेले प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे.
शाळेतील स्थितीबाबत लोकमतने वाचा फोडल्यामुळे आयुक्तांनी तातडीने दखल घेतली. मनपातील शिल्लक कॅमेरे शाळेत बसविण्यात आले व इतर सुविधा दिल्या. यामुळे तळीरामांवर कॅमेºयाची नजर स्थिरावल्याने प्रकार बंद झाले आहेत.
आनंद चंदनशिवे, नगरसेवक