अरुण बारसकर सोलापूर: कांद्यासाठी नावाजलेल्या लासलगाव, पिंपळगाव, उमराणे या नामांकित बाजार समित्यांना मागे टाकत सोलापूरबाजार समिती कांदा विक्री व उलाढालीत राज्यात अव्वल ठरली आहे. मागील नोव्हेंबर महिन्यात एकट्या सोलापूर बाजार समितीत ४ लाख ३९ हजार १७ क्विंटल कांदा विक्रीतून १२५ कोटी १९ लाख ४७ हजार ३०० रुपयांची उलाढाल झाली आहे. ही उलाढाल अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत अव्वल आहे.
कांदा उत्पादन व विक्रीबाबत नाशिक जिल्ह्याचे नाव घेतले जाते. नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यात कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यामुळेच नाशिक जिल्ह्याला कांद्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. मात्र सोलापूर जिल्हाही आता मागे राहिला नाही. नाशिक जिल्ह्याप्रमाणेच सोलापूर बाजार समित्यांमध्येही कांदा विक्री होतो. मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर बाजार समिती कांदा विक्रीत अव्वल आहे. आॅक्टोबरच्या दुसºया पंढरवड्यापासून कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली. त्याचा उच्चांक दोन डिसेंबर रोजी झाला आहे.
सोलापूर बाजार समितीत कांद्याला मागील महिनाभर अन्य बाजार समित्यांपेक्षा सर्वाधिक दर मिळतो. सोलापूर बाजार समितीत ३० नोव्हेंबर रोजी कांद्याला राज्यात सर्वाधिक क्विंटलला ९ हजार १०० रुपये दर मिळाला तर २ व ३ डिसेंबर रोजी सर्वाधिक १५ हजार रुपये इतका दर मिळाला. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये यापेक्षा कमी दर मिळाला होता.
नोव्हेंबर महिन्यात दररोज कांद्याची विक्री चढ्या दराने झाली. यामुळे महिनाभराची उलाढालही मोठी झाल्याचे आकडेवारीनुसार दिसत आहे. एकट्या सोलापूर बाजार समितीत नोव्हेंबरमध्ये ४ लाख ३९ हजार १७ क्विंटल कांद्याची विक्री झाली व त्यातून १२५ कोटी १९ लाख ४७ हजार रुपयांची उलाढाल झाली. या महिन्यात २५ दिवस कांद्याचे लिलाव झाले म्हणजे दररोज ५ कोटींचा कांदा विकल्याचे दिसून येते. लासलगाव बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात एक लाख ६ हजार ३८९ क्विंटल आवक व ५१ कोटी ६१ लाख ६३ हजार रुपयांची उलाढाल झाली.
प्रमुख बाजार समितीतील कांदा खरेदी-विक्रीवर दृष्टिक्षेप..
- - अहमदनगर बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात एक लाख ६९ हजार ५१६ क्विंटल कांद्याच्या विक्रीतून ८४ कोटी ७५ लाख ८० हजार रुपये इतकी उलाढाल झाली. घोडेगाव उपबाजार समितीत एक लाख ५० हजार ७९ क्विंटल कांद्याची विक्री व ४५ कोटी १२ लाख रुपयांची उलाढाल झाली.
- - लासलगावनंतर पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा उल्लेख केला जातो. या बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात ८१ हजार २३७ क्विंटल कांदा विक्रीतून ४० कोटी ५१ लाख ६३ हजार रुपये उलाढाल झाली.
- - सटाणा बाजार समितीत ८७ हजार १९७ क्विंटल कांदा विक्रीतून ४४ कोटी ४६ लाख ११ हजार रुपये, देवळा बाजार समितीत ४७ हजार ५१५ क्विंटल कांदा विक्रीतून १९ कोटी ५८ लाख ९५हजार, चांदवड बाजार समितीत २६ हजार २६१ क्विंटल कांदा विक्रीतून १३ कोटी २२ लाख रुपये, उमराणे बाजार समितीत एक लाख २४ हजार १२६ क्विंटल कांद्याची विक्री झाली.
लिलावात पारदर्शकता असल्याने पुणे, अहमदनगर, नाशिक तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यासह कर्नाटकचाही कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येतो. त्यामुळेच ही समिती कांदा विक्रीत राज्यात प्रथम आहे. शेतकºयांचा आडत्यावर विश्वास आहे.- श्रीशैल नरोळेउपसभापती, सोलापूर बाजार समिती