सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम याला शनिवारी सोलापुरात तपासासाठी घेऊन येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत सोलापूर शहरात ११ लाख ७५ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा आ. कदम याच्यावर दाखल आहे.मोहोळ येथील आमदार रमेश कदम आॅगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१४ या काळात महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे महासंचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत कदम याने इतर सदस्यांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याने निष्पन्न झाले आहे.सद्यस्थितीत आ. रमेश कदम बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात असल्याचे शेख म्हणाले. मुंबईच्या विशेष न्यायालयात आ. कदम याला ताब्यात घेण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वॉरंट दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सदर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीला ताब्यात घेण्यात येणार आहे. विकास महामंडळात आमदार रमेश कदमने मराठा समाजाच्या एका व्यक्तीला सदर योजनेंतर्गत ११ लाख ७५ हजार रुपयांची गाडी दिली. ही योजना मातंग समाजासाठी असतानादेखील नियमांचे उल्लंघन करुन शासनाची फसवणूक केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सोलापुरात दाखल झालेल्या गुन्ह्यात महामंडळाचे आमदार रमेश कदम याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. मुंबई आॅर्थर जेल येथून २० आॅगस्टला आरोपी आ.कदम याला ताब्यात घेण्यात येणार आहे.- रहेमान शेख, सपोनि, आर्थिक गुन्हे शाखा
कदमला आणणार सोलापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2016 1:06 AM