ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 5 - शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पूर्व वैमनस्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला. किरकोळ कारणामुळे झालेल्या वादातून एका गटाने शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये घुसून दुस-या गटावर तलवारीने हल्ला चढवल्याची धक्कादायक घडना घडली आहे. या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहे
यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सर्फराज जहागीरदार, सईद जहागीरदार, कदीर जहागीरदार, इम्रान शेख, समीर जहागीरदार, गाजी जहागीरदार, बरकत जहागीरदार, समद जहागीरदार अशी जखमींची नावे आहेत.
लोकमान्य नगरमध्ये जहागीरदार यांच्या बाईकला एका रिक्षाचालकाकडून धडक बसली होती. यावेळी दोघांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यातील दोन जणांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान झालेल्या वादाचा राग मनात ठेवून रिक्षाचालकाच्या गटातील सुमारे 40 ते 50 जणांनी हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये घुसून उपचार घेणा-या जहागीरदार यांच्या गटातील लोकांवर तलवारींसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
दरम्यान, यानंतर वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धावत घेत परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच हॉस्पिटलमध्येही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.