सोलापूर : उपळाई बुद्रुक (माढा जि. सोलापुर) ची सुकन्या व तमिळनाडू राज्यातील सेलमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणुन कर्तव्य बजावलेल्या सोलापूरच्या कन्या रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांची भारत सरकारच्या नवी दिल्ली येथे उच्च शिक्षण विभागाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरच्या कन्येला दिल्लीत मोठी जबाबदारी मिळाल्याने सोलापूरची मान उंचावली आहे़ शैक्षणिक क्षेत्राविषयी आवड असुन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती आपल्या देशात कशाप्रकारे राबवता येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत आयआयटी, आयआयएम, एम्स, एनसीईआरटि, सीबीएसई, आयसीएसई, युजीसी व इतर प्रमुख प्रमुख संस्था या खात्याअंतर्गत येतात. रोहिणी भाजीभाकरे-बिदरी या 2008 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 118 व्या क्रमांकाने आयएएस म्हणून उत्तीर्ण झाल्या होत्या. प्रशिक्षणानंतर त्यांची तमिळनाडू राज्यात नियुक्ती करण्यात आली होती. मदुराई जिल्ह्याच्या सहायक जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी व तिरूमेलवेली च्या उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
भाजीभाकरे यांनी मदुराई जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी व तिरूमेलवेलीच्या उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवरचा 'भाजीभाकरे' पॅटर्न तामिळनाडू राज्यात प्रसिध्द झाला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेत तामिळनाडू राज्यात मदुराई येथे कार्यरत असताना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांची प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तमिळनाडू सरकारने त्यांना सेलम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.