ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 23 : वर्षानुवर्ष सत्तेवर विराजमान असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करीत भाजपाने यंदाच्या महापालिका निवडणुकीत चांगलीच मुसंडी मारली़, दुपारच्या सत्रापर्यंत सोलापूर महापालिकेच्या १०२ जागेसाठी झालेल्या मतदानात ३९ जागेवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे़ त्यामुळे सोलापूर महापालिकेवर भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे़ दुपारच्या सत्रापर्यंत भाजप ३९, शिवसेना १४, कॉग्रेस ११, बसपा ४, एमआयएमला ४ जागेवर विजय मिळविता आला आहे़
दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेसाठी २१ फेबु्रवारी रोजी झालेल्या मतदानानंतर २३ फेबु्रवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास मतमोजणीस प्रारंभ झाला़ मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपाच्यावतीने प्रभाग ८ मधील अमर पुदाले, शोभा बनशेट्टी, सोनाली मुटकेरी, नागेश भोगडे या उमेदवारांनी विजयाची सलामी दिली़ त्यानंतर प्रभाग १ मधील रविंद्र गायकवाड, राजश्री कणके, निर्मला तांबे, अविनाश पाटील, प्रभाग १ मधील नारायण बनसोडे, कल्पना कारभारी, शालन शंकर शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र डॉ़ किरण देशमुख यांनी भाजपाच्या विजयाची घौडदौड सुरूच ठेवली़ दुपारी बाराच्या सुमारास एकामागून एक धक्कादायक निकाल समोर येत होते़
दरम्यान, महापालिकेत माजी महापौर म्हणून कारकीर्द गाजविलेले प्रविण डोंगरे, दिलीप कोल्हे यांचा पराभव करीत शिवसेनेच्या नवख्या उमेदवारांनी चांगलाच धक्का दिला़ त्यानंतर प्रभाग ९ मधील भाजपाच्या राधिका पोसा, रामेश्वरी बिरू, नागेश वल्याळ, अविनाश बोमड्याल यांनी विजय मिळविला़ त्यानंतर शिवसेनेच्यावतीने प्रथमेश कोठे, सावित्रा सामल, मीराबाई गुर्रम, विठ्ठल कोटा, प्रभाग १२ मधून शशिकला बत्तुल, देवी झाडबुके तर शिवसेनेचे विनायक कोड्याल यांनी विजय संपादन केले़ याशिवाय प्रभाग १९ मधून श्रीनिवास करली, अनिता कोंडी, वरलक्ष्मी पुरूड तर शिवसेनेचे गुरूशांत धुत्तरगांवकर यांनी विजय मिळविला़
यंदाच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने चांगलीच मुसंडी मारली आहे़ एमआयएमच्यावतीने पुनम बनसोडे, जुबेर शेख, वसीम शेख यांनी विजय मिळविला़ भाजपाने बहुमत सिध्द केल्यास भाजपाचा उमेदवार महापौर पदावर विराजमान होईल़ विजय खेचुन आणण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा़ शरद बनसोडे, शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी चांगलेच परिश्रम घेतले आहे़