ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 20 - मुदतवाढ देण्यासाठी व 8 महिन्यांपासून रखडलेले वेतन अदा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे सह-आयुक्त वर्ग-2चे प्रदीप साठे यांना 20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
दरम्यान, तक्रारदार हे मागील 3 वर्षापासून आवेक्षक (स्थापत्य) या पदावर सोलापूर महानगरपालिका येथे कार्यरत आहेत.
त्यांची गेल्या 8 महिन्यापुर्वी मुदत संपली असल्याने मुदतवाढ मिळवण्यासाठी वेळोवेळी सह-आयुक्त प्रदीप साठे यांना भेटले होते.
त्यावेळी झालेल्या चर्चेवेळी प्रदीप साठे यांनी 20 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. या मागणीमुळे तक्रारदार यांनी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानुसार 19 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यावेळी त्यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले होते. त्यानुसार 20 जानेवारी रोजी महापालिका कार्यक्षेत्रात 20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना सह-आयुक्त प्रदीप साठे यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सह-आयुक्त प्रदीप साठे यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. ही कारवाई सह-पोलीस आयुक्त अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
आणखी बातम्या