सोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालून कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या गुरुवारी न्यायालयात हजर झाल्या. प्रत्येक तारखेस हजर राहण्यास सांगून १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के. अनभुले यांनी जामीन मंजूर केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात २ जानेवारी २0१८ रोजी बैठक झाल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख बाहेर आले असता, आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, केशव इंगळे, करीम शेख आदी कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. बेकायदेशीर जमाव जमवून त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण केला. त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस नाईक अजित देशमुख यांना धक्काबुक्की झाली. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांना तपास कामात सहकार्य करण्याच्या आणि पुराव्यात ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर अंतरिम जामीन देण्यास हरकत नाही असा युक्तिवाद करत म्हणणे दाखल केले. आमदार प्रणिती शिंदे यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देऊन जामीन मंजूर केला. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे,अॅड.विनोद सूर्यवंशी, अॅड.दत्ता गुंड यांनी काम पाहिले.
न्यायालयीन कोठडीची मागणी- आमदार प्रणिती शिंदे या गुरुवारी न्यायालयात हजर झाल्या तेव्हा न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागवले. जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी आमदार प्रणिती शिंदे व चेतन नरोटे यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यात यावे असे म्हणणे सादर केले. न्यायालयाने प्रणिती शिंदे यांना न्यायालयीन कोठडीत घेण्याचा आदेश केला; मात्र त्याचवेळी मूळ जामिनाचा अर्ज व अंतरिम जामिनाचा अर्ज आमदार प्रणिती शिंदे व चेतन नरोटे यांनी दाखल केला होता, त्यामुळे जामीन झाला. या प्रकरणी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, केशव इंगळे, करीम शेख आदींना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे.