रुपेश हेळवे
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात ७०० नव्या एसटी गाड्यांचा समावेश होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच केली़ या सर्व गाड्यांचे आरटीओ पासिंग सोलापुरात होणार आहे़ यामुळे आता राज्यभर सोलापुरात पासिंग झालेल्या म्हणजेच एचएच १३ च्या गाड्या धावताना दिसणार आहेत़ इतिहासात पहिल्यांदाच सोलापुरात एसटीच्या ७00 गाड्यांचे पासिंग येत्या काळात सोलापुरात होणार आहे़ या सर्व गाड्यांची बांधणी जहिराबाद येथे होणार असून येथून सोलापूरचे अंतर जवळ असल्याने या गाड्यांचे पासिंग सोलापुरात करण्यात येणार आहे.
सोलापुरात पहिल्यांदाच एकदम ७00 गाड्यांचे पासिंग होणार आहे़ यामुळे आता राज्यभर सोलापूर पासिंगच्या गाड्या धावणार आहेत़ या सर्व गाड्या अत्याधुनिक अशा एमएस बॉडीच्या असणार आहेत़ सर्व जाहीर केलेल्या गाड्यांची बांधणी ही जहिराबाद येथे होणार आहे़ यामुळे या सर्व गाड्यांचे पासिंग सोलापुरात होणार आहे.
पासिंगसाठी पहिली गाडी ही पुढील आठवड्यामध्ये दाखल होणार आहे़ आतापर्यंतच्या गाड्यांची बांधणीही दापोली, औरंगाबाद, नागपूर येथे होत होती़ यामुळे सर्व गाड्यांचे पासिंग एमएच १२, एमएच २० अशा नंबरने होत होते़ पण या गाड्यांचे पासिंग सोलापुरात होणार असल्यामुळे येथील म्हणजे एमएच १३ या नंबरने होईल.
अशी आहे या गाड्यांची रचना- ज्या गाड्यांची सोलापुरात नोंदणी होणार आहे या सर्व गाड्या एमएस बॉडीच्या आहेत़ या गाड्यांचे आयुष्यमान जुन्या लालपरीच्या मानाने जास्त आहे़ या गाडीस जर अपघात झाल्यास प्रवासी जखमी होण्याची शक्यता कमी असते़ ही गाडी ४२ सीटची असणार आहे़
- एसटीच्या गाड्यांना रजिस्ट्रेशनसाठी जास्त खर्च येत नाही़ पण जवळपास एका गाडीच्या पासिंगसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो़ अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर संजय डोळे यांनी दिली़
एकूण ६00 गाड्यांच्या नोंदणीबाबतचे पत्र आम्हाला मिळाले आहे़ या सर्व गाड्यांची नोंदणी ही सोलापुरात होणार आहे़ सोलापुरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्यांचे पासिंग होणार आहे़ या सर्व गाड्या माईल्ड स्टिल प्रकारातील आहेत़ पहिली गाडी पुढील आठवड्यामध्ये सोलापूर विभागात दाखल होणार आहे़ - डी़ जी़ चिकोर्डे,यंत्र अभियंता, सोलापूर एसटी विभाग