ऑनलाइन लोकमतटेंभुर्णी, दि. ६ : अवैध वाळू उपसा करून निघालेला ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या माढ्याच्या तहसीलदारांच्या जीपवर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ ही घटना मंगळवारी शेवरे (ता़ माढा) येथे घडली आहे़
अधिक माहिती अशी, माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे हे मंगळवारी सकाळी शासकीय जीपमधून (एम़ एच़ ४५ - डी ००३८) माळशिरस येथे वारी नियोजन बैठकीसाठी निघाले होते़ ते टेंभुर्णी -अकलूज मार्गावरून जात असताना शेवरे येथे समोरून वाळू घेऊन टेंभुर्णीकडे निघालेला ट्रॅक्टर दिसला़ त्यांनी ट्रॅक्टर चालकास इशारा देऊन थांबविण्यास सांगितले़ मात्र इशारा देऊनही ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर वेगाने चालवित होता़ तेव्हा तहसीलदारांनी जीप वळवून ट्रॅक्टरच्या समोर आडवी लावली़ तेव्हा ट्रॅक्टर चालकाने जीपला धडक देणार इतक्यात तहसीलदार व अन्य कर्मचाऱ्यांनी उडी मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला़ या ट्रॅक्टरच्या धडकने जीपचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले़ तर ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉली रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाल्या़ यानंतर चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला़
यावेळी तहसीलदार पडदुणे यांच्यासह चालक अतुल सुभाष दहिटणकर, तलाठी प्रशांत जाधव, पी़ बी़ तेरकर, अनंत डोरे, अनभुले उपस्थित होते़ यामध्ये कोणीही जखमी झाले नाही़ माळशिरस येथील बैठक करून परत आल्यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात चालक अतुल दहिटणकर यांच्या फिर्यादिवरून ट्रॅक्टर मालक राजेंद्र दत्तू पराडे (रा़ संगम, ता़ माळशिरस) याच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कलम ३०७, ३५३, ४२७, १८६, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे़ -------------------------आठवड्यातील दुसरी घटना३० जून रोजी हॉटेल जंजिरा येथे छापा टाकण्यास गेलेल्या पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील उपअधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या नेतृत्वाखालील पथकावर हल्ला केल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाले होते़ ही घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा शासकीय कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला़.----------------मी येण्यापूर्वी वर्षात ३१ वाहनांवर कारवाई करून केवळ ४ जणांवर गुन्हे दाखल होते़ मी पदभार स्वीकारल्यानंतर चार महिन्यातच ६७ वाहनांवर कारवाई करून २९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत़ त्यांच्याकडून ४७ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे़ अशी धडाकेबाज कारवाई करणाऱ्यावर हल्ले होणे गंभीर बाब आहे़ याची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन स्ट्राँग पोलिसिंग केले पाहिजे़ - सदाशिव पडदुणे,तहसीलदार