प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला; "आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 09:21 AM2024-11-21T09:21:00+5:302024-11-21T09:22:03+5:30
सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादींना काँग्रेस नेत्यांना मतदानाच्या दिवशी जाहीर पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाची कोंडी झाली.
सोलापूर - जिल्ह्यातील सोलापूर दक्षिण मतदारसंघात मतदानाच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद विकोपाला गेला आहे. या मतदारसंघात ऐनवेळी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांची कोंडी झाली. या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गट चांगलाच खवळला असून येथील स्थानिक नेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांना इशारा दिला आहे. संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले.
शरद कोळी म्हणाले की, प्रणिती शिंदे या गद्दार असून त्यांनी शिवसैनिकांचा घात केला आहे. महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे आमच्या पक्षातील सर्व नेत्यांकडे मागणी आहे तातडीने प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी करा. काँग्रेसनं खासदारकी रद्द केली पाहिजे. शिवसैनिकांच्या जीवावर खासदार झाली. प्रणिती शिंदेला लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे आजारी असताना या लोकांनी बूट चाटण्याचं काम केले, आजारी असतानाही प्रणिती शिंदेसाठी सभा घेतली एवढीही जाण राहिली नाही. प्रणिती शिंदेने भाजपाकडून सुपारी घेतली आहे. खासदारकीला भाजपाने मदत केली म्हणून सोलापूर दक्षिण मतदारसंघात सुभाष देशमुखांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असा आरोप त्यांनी केला.
त्याशिवाय आमचा उमेदवार निवडून येणार त्यामुळे काही फरक पडत नाही पण या काँग्रेसवाल्यांना ठेचून काढलं पाहिजे. आपण सहन करतोय म्हणून माघार घेतोय असं यांना वाटत असेल. प्रणिती शिंदे काय तुझ्या बापालाही भीत नाही. प्रणिती शिंदे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. व्याजासह आम्ही परतफेड करणार, प्रणिती शिंदे यांच्यात दम असेल तर इथून पुढे मतदारसंघात आणि सोलापूर जिल्ह्यात फिरून दाखवावे, जिथं तिची गाडी दिसेल तिथे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशाराही कोळी यांनी दिला आहे.
नेमकं काय घडलं?
सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला. महाविकास आघाडीत या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाने दावा केला होता. परंतु मतदारसंघात ठाकरेंचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी मिळाली. सोलापूर दक्षिण मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसनं दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली परंतु एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळे आम्ही धर्मराज काडादी यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला सांगितला. ठाकरे गटाच्या नेत्यांनी इथे गडबड केली. मागे एका वेळेस कधीतरी शिवसेनेचा आमदार निवडून आला त्या मुद्द्यावर ते मतदारसंघ मागत होते, हे चुकीचे होतं असं सुशील कुमार शिंदेंनी सांगितले.