"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 02:35 PM2024-11-20T14:35:26+5:302024-11-20T14:36:22+5:30
सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ठाकरेंची कोंडी झाली आहे.
सोलापूर - महाविकास आघाडीने सोलापूर दक्षिण मतदारसंघात अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे कोणत्या पक्षाचे आहेत, ते काँग्रेसचे नसून ही भाजपाची बी टीम आहे. प्रणिती शिंदे स्वत:च्या राजकारणासाठी पक्षाचं काम करत नाही. त्यांना लोकसभेला भाजपानं मदत केली अशी चर्चा आहे. त्यामुळे आता भाजपाकडून सुपारी घेऊन त्यांनी अपक्षाला पाठिंबा दिला आहे असा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केला आहे.
सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी दिलेले उमेदवार अमर पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झालं आहे. शिंदे कुटुंबाच्या भूमिकेनंतर ठाकरे गट संतापला आहे. याबाबत शरद कोळी म्हणाले की, प्रणिती शिंदे भाजपाची बी टीम आहे. भाजपाचा प्रचार करते. आतून त्यांची हातमिळवणी झाली आहे. तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल. यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर कुठेही खासदार म्हणून निवडून येणार नाही याचा बंदोबस्त शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही. शिवसैनिकांचा केसाने गळा कापण्याचं काम तुम्ही केलंय असा आरोप त्यांनी केला.
तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही, प्रणिती शिंदे यांनीही केला नाही. प्रणिती शिंदे यांना शिवसैनिकांनी मदत केली नसती तर स्वप्नातही खासदारकी बघता आली नसती. डिपॉझिट जप्त झाले असते. उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी केलेल्या कामामुळे तुम्हाला खासदारकी मिळाली, तुम्ही आभार मानायचे सोडून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केले. यापुढची खासदारकी तुम्ही स्वप्नात बघायची. तुम्ही खासदार होणार नाही याची दक्षता शिवसैनिक घेणार असंही शरद कोळी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ही माणसं धोकेबाज निघाली, ते गद्दारीच करणार कारण ते भाजपाची बी टीम आहे. भाजपाचा उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी अपक्षाला पाठिंबा दिला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावध राहावे. अमर पाटीलला निवडून द्यावे. उद्धव ठाकरेंचा शब्द म्हणजे शब्द, मात्र काही माणसं सकाळ दुपार संध्याकाळ शब्द बदलतात. प्रणिती शिंदे यांचे नामोनिशान सोलापूर जिल्ह्यातून मिटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी दिला आहे.