शीतलकुमार कांबळे
सोलापूर : ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही.., डॉन को पकडना मुश्कील ही नही तो नामुमकिन है.., आज मेरे पास बंगला है, गाडी है, बैंक बैलेंन्स है, क्या है तुम्हारे पास?, अशा प्रकारचे चित्रपटातील संवाद कुठल्या रसिकाला माहीत नाही असे नाही. अभिनयाचा सम्राट, महानायक अमिताभ बच्चन याचे फॅन देशभरात पाहायला मिळतात. या सगळ्यामध्ये सोलापुरातील फॅ न्सने आपले वेगळेपण जपले आहे. यामुळे अमिताभ बच्चन यांना देखील सोलापुरातील फॅन्सने भुरळ घातली आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांचा आज (शुक्रवारी) ७७ वा वाढदिवस आहे. यानिमित्त ‘लोकमत’ने येथील ‘बिग बी’च्या फॅनशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या महानायकाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. आजच्या वाढदिवसानिमित्त येथील केक कापून आनंद साजरा करणार आहेत; तर अमिताभ म्हणाले, पिछले दो साल आप आए नही. जंजीर चित्रपट पाहिल्यापासून प्रदीप उमरजीकर हे अमिताभचे फॅन झाले. ते इतके फॅन झाले की, त्यांनी जंजीर चित्रपट १०० वेळा पाहिला. मागील २५ वर्षांपासून ते अमिताभ बच्चन यांना भेटतात व त्यांचे पेंटिंग भेट देतात. २००३ मध्ये प्रदीप उमरजीकर यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे दोन वर्षे ते अमिताभ यांना भेटायला गेले नव्हते.
२००५ मध्ये ते जलसा येथे अमिताभ यांना भेटल्यानंतर मागील दोन वर्षे भेटायला का आला नाहीत, असा प्रश्न केला. यामुळे अमिताभ बच्चन यांच्या आठवणीत असल्याने खूप छान वाटल्याचे उमरजीकर यांनी सांगितले. आतापर्यंत अमिताभ बच्चन यांना त्यांनी व त्यांच्या पत्नी छाया उमरजीकर यांनी रेखाटलेली १५० चित्रे भेट दिली आहेत. मंदिरातील देवाचे दर्शन घेतल्यानंतर जे समाधान मिळते ते अमिताभ यांना भेटल्यानंतर मिळते. आज माझ्याकडे त्यांनी लिहिलेली १५ पत्रे, सुमारे ४ हजार फोटो असल्याचे उमरजीकर यांनी सांगितले.
एकाच दिवशी तीन वेळा चित्रपट पाहिला अन् आई-बाबांचा खाल्ला मार..- कोण कुणाचा कु ठपर्यंत फॅन होऊ शकतो किंवा फॅन होण्याची सीमारेषा काय, असे विचारल्यास तो ज्युनिअर बच्चन इतका असू शकतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट सहज पाहिल्यानंतर तो इतका आवडला की त्याच दिवशी तीन वेळा पाहिला. मग घरी गेल्यावर आई-बाबांनी चांगलीच धुलाई केली. या फॅनचे नाव महादेव मादगुंडी. अमिताभचे ते इतके मोठे फॅन झाले की ते आजही अमिताभ बच्चन यांच्यासारखा पेहराव करतात. इतकेच नाही तर त्यांची गाणी म्हणणे.. त्यांचे डायलॉग म्हणणे.. सध्या ते स्वत:चा आॅर्केस्ट्रा चालवतात. काही वर्षे ते कामानिमित्त मुंबईत राहिले. अमिताभ यांना भेटून ग्रीटिंगही दिले. त्यावेळी अमिताभ यांनी मादगुंडी यांचे केस खरे आहेत का विचारले. केस खरेच आहेत आणि मी मेकअप देखील करत नाही, असे म्हटल्यावर बच्चन यांनी आप वाकई सोलापूर के बच्चन हो, असे म्हणत टाळी दिली.
लग्नापूर्वीच ठरवले आपल्या मुलाचे नाव तुफान ठेवायचे- या चित्रपटात तुफान घोड्यावरून येतो. अन्यायाविरुद्ध लढतो. हा चित्रपट शहेनशहा शेख यांना इतका भावला की, त्यांचे लग्न होण्यापूर्वीच आपल्या मुलाचे नाव तुफान ठेवायचे त्यांनी ठरवले होते. आता त्यांचा मुलगा तुफान २० वर्षांचा आहे. शहेनशहा शेख हे साईनाथ नगर येथे पानाचे दुकान चालवतात. त्यांच्या दुकानाचे व त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही वाहनांवर त्यांनी तुफान लिहिले आहे. शोले, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील गाणी व संवाद त्यांना तोंडपाठ आहेत.. ३५ वर्षांपूर्वी ते अमिताभ बच्चन यांना भेटले. आपल्या दुकानात त्यांनी अमिताभ यांच्यासोबतचा फोटो देखील ठेवला आहे.
सोलापुरी चाहत्यांचा ‘किस्से बोल बच्चन के’- ज्युनियर बच्चन महादेव मादगुंडी यांनी किस्से बोलबच्चन के या नावाने एक व्हिडीओ बनवला आहे. त्यांच्या यू ट्यूब चॅनलवर तो १० आॅक्टोबर रोजी मध्यरात्री अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सोलापुरातील अमिताभ बच्चन यांचे फॅन बोलते झाले आहेत. त्यांनी पहिला चित्रपट कोणता पाहिला, त्यांना अमिताभ का आवडतात, कोणत्या चित्रपटातून काय शिकायला मिळाले, अमिताभ यांच्या चित्रपटाविषयी चाहत्यांचा एखादा अनुभव सोलापुरातील चाहत्यांनी व्यक्त केला आहे.