सोलापूर : कृष्णेला आलेल्या पुरामुळे अवघं जीणं जलमय झालेल्या सांगलीकरांना मदतीची गरज होती..ते जगणं असं झालंय की, मदतीची हाक देण्याचे त्राण कुणात नाहीत..पाण्याशी संघर्ष करण्यातच सांगलीकरांचा दिवस अन् रात्र जातेय..सर्वत्र दिसणाºया अन् अथांग पसरलेल्या पाण्याने भयभीत झालेल्या महिला, मुलं अन् रूग्णशय्येवर पडलेल्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं तर मोठं आव्हानच होतं..संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी आपला हात पुढं करणं हा तर सोलापूरकरांचा धर्म हा धर्म सोलापूर जिल्ह्यातील युवकांनी विशेषत: मच्छिमारांनी मोठ्या निष्ठेने पाळला अन् सांगलीकरांचे जीवन सुसह्य करण्यात स्वत:त तन - मन - धन अर्पण केलं.
सततच्या पावसामुळे सांगलीला कृष्णा अन् कोयनेच्या पाण्याने वेढा दिला आहे. चौक, गल्ला तर सोडाच अगदी छोट्या बोळातही पाणी शिरलं...घरं पाण्यात गेली. या पुरात जीवन सुरक्षित करणं,हाच सध्या सांगलीकरांचा ध्यास आहे. या स्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर तसेच जिल्हा प्रशासनाने आवाहन केले अन् करमाळा तालुक्यातील मच्छिमारीचा व्यवसाय करणारे युवक स्वत:च्या होड्यांसह सज्ज झाले.
करमाळा तालुक्यातील चिखलठाण, केत्तूर, टाकळी, कंदर, कोंढारवाडी, रामवाडी गावातील मच्छिमारांनी आपल्या होड्या ट्रकमध्ये भरल्या अन् थेट सांगली गाठली...एकवीसजणांचे पथक आज सकाळपासून लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी होड्यांसह पाण्यात उतरले. सांगलीचे उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला हे पूर्वी करमाळयाचे मुख्याधिकारी होते. त्यांनी या पथकाला कुठल्या भागातून कुणाला कुठे सुरक्षित हलवायचे, याचे मार्गदर्शन केले. पूरग्रस्त मुलं, महिला अन् आजारी व्यक्तींना प्राधान्य देत, त्यांना सुरक्षितस्थळी हलविले...जोपर्यंत प्रत्येक सांगलीकर सुरक्षित होत नाही. तोपर्यंत थांबायचं नाही, असा या मच्छिमारांनी निर्धार व्यक्त केलायं.-११४ लोकांना सुरक्षित हलविलेसोलापूर जिल्ह्यातून गेलेल्या पथकाने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने काम सुरू केले आहे. आज पहाटे सांगली पोहोचल्यानंतर त्यांनी वेगळवेगळ्या भागातील पूरस्थितीचे निरीक्षण केले. उपजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची कुठे गरज आहे. त्या भागांचा प्राधान्यक्रम ठरविला अन् मोहीम सुरू केली. सकाळपासून ११४ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.