भ के गव्हाणे / शहाजी फुरडे- पाटील
बार्शीची कन्या: सानियासोबत दुहेरीत खेळण्याचा मान
बार्शी, दि. 11 - बार्शीची कन्या असलेली आंतरराष्ट्रीय टेनिसस्टार प्रार्थना ठोंबरे आगामी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिला दुहेरीत टेनिसपटू सानिया मिर्झासोबत खेळणार आहे. पाच ऑगस्टपासून ब्राझीलमध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या वृत्ताने बार्शीसह सोलापूर जिल्ह्याच्या क्रीडा विश्वात आनंदाला उधाण आले आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून टेनिस खेळणारी बार्शीची आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रार्थना ठोंबरेची ब्राझील येथे होणा-या रिओ ऑलिम्पिक टेनिस क्रीडा स्पर्धेत निवड जाहीर होताच शहरातील अनेकांनी जल्लोष साजरा करून आनंदोत्सव साजरा केला.
जगातील नंबर वनवर असलेली टेनिसपटू सानिया मिर्झाने प्रार्थनाच्या निवडीसाठी कौल देताच अखिल भारतीय टेनिस महासंघाच्या आज झालेल्या बैठकीत निवडीची घोषणा करण्यात आली. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेतील टेनिस महिलांच्या दुहेरी स्पर्धेत सानिया व बार्शीची प्रार्थना भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या स्पर्धा 5 ऑगस्टपासून ब्राझील येथे होत आहेत.
आजर्पयत सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही खेळाडूची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झालेली नाही. शिवाय महाराष्ट्रातून इतर खेळातील खेळाडूंची निवड झालेली असली तरी महिलांच्या टेनिस स्पर्धेसाठी पहिलीच निवड आहे. ही जिल्ह्याच्या स्वाभिमानाची बाब असून महाराष्ट्रातून टेनिस खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणारी ग्रामीण भागातील एकमेव टेनिसपटू ठरणार आहे. जागतिक क्रमवारीतसुद्धा प्रार्थना ठोंबरे अव्वल स्थानावर आहे तर भारतीय क्रमवारीत सानियानंतर प्रार्थना द्वितीय स्थानावर आहे. प्रार्थनाच्या निवडीची घोषणा झाली तेव्हा ती फ्रान्समध्ये होती.
ही निवड म्हणजे माझ्या अंगणात कल्पवृक्ष लावल्यासारखे आहे. आज तिचे आजोबा भाऊसाहेब झाडबुके असते तर त्यांनी स्वत:च्या खांद्यावरून मिरवणूक काढली असती. प्रार्थना ही अत्यंत मनमिळावू व माणुसकी जपणारी आहे. ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचूनही ती जमिनीवर पाय ठेवून आहे. मला आजर्पयत मिळालेल्या अनेक पुरस्कारांपेक्षा प्रार्थनाची आजची ऑलिंपिकची निवड म्हणजे मला मिळालेला आजी म्हणून जीवनातील सर्वोच्च पुरस्कार आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात झाडबुके यांच्या घरीच टेनिस कोर्ट होते. या ऑलिम्पिक निवडीमुळे ठोंबरेसह झाडबुके घराण्याचे नाव उज्ज्वल केले असले तरी तिच्या या यशामागे तिची आई वर्षा ठोंबरे व वडील गुलाब ठोंबरे यांचे फार मोठे श्रेय आह़े. आजर्पयत परमेश्वराने सर्व काही दिले असले तरी त्यात प्रार्थनाच्या यशाची भर पडली असल्याने आता मी खूप समाधानी असल्याचे सांगितले.
-श्रीमती प्रभाताई झाडबुके, माजी आमदार, प्रार्थनाची आजी
अनेक वर्षापासून प्रार्थनाचे ऑलिम्पिक व विम्बल्डन स्पर्धेचे स्वप्न होते त्यातील ऑलिम्पिकसाठी निवड झाल्याने ते पूर्ण झाले असून आगामी विम्बल्डन स्पर्धेतसुद्धा नक्कीच खेळणार याची खात्री आहे. तिने आजर्पयत या टेनिस खेळासाठी कष्ट केल्याने तिला यश मिळाले असून महाराष्ट्रातील विशेषत: ग्रामीण भागातील पहिली महिला खेळाडू आहे. आजर्पयत तिने वेळेचे बंधन व शिस्तप्रिय यामुळेच या यशार्पयत ती पोहोचली. तिने आजर्पयत टेनिस स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 17 पारितोषिके मिळवली आहेत.जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.जागतिक पातळीवरील टेनिस स्पर्धेतील अव्वल स्थानावर असलेल्या महिला व पुरुष संघातील एकमेव खेळाडू असल्याचे सांगितले.
-वर्षाताई ठोंबरे, प्रार्थनाची आई
ऑलिम्पिकमध्ये खेळणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असत़े देशाची अव्वलस्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत आगामी रिओ ऑलिम्पिममध्ये खेळण्याची मला सुवर्ण संधी मिळाली़ त्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला आह़. माझे आई-वडील, गुरुजन, प्रशिक्षकांसह सर्वाच्या प्रोत्साहनामुळे आज माझी रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची स्वप्नपूर्ती झाली आह़े
-प्रार्थना ठोंबरे, टेनिसस्टार
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातील प्रार्थना ठोंबरेसारखी एखादी मुलगी ऑलिम्पिकमध्ये खेळतेय याचा अभिमान वाटतो़. तिने घेतलेले कठोर मेहनत फळास आल. आजोबा अप्पासाहेब झाडबुके यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या सातव्या वर्षापासून तिने टेनिसचे धडे घेतले आहेत. प्रिसिजन क्रॉम्टशॉफ्टने तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी पुरस्कृत केले होत़े
-राजीव देसाई, महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष