पुणे : दररोज लाखो प्रवाशांचा राबता असलेले पुणे स्टेशन आता सौरऊर्जेने झळकणार आहे. मध्य रेल्वेच्या वतीने पर्सिस्टंट फाउंडेशनच्या माध्यमातून सीएसआर अंतर्गत बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा यंत्रणेचे उद्घाटन येत्या २ सप्टेंबर रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या सौरऊर्जा यंत्रणेमुळे १६० किलोवॉट वीजनिर्मिती होणार असून, रेल्वेस्थानकासाठी ही वीज वापरली जाणार आहे. त्यासाठी फालट क्रमांक एक आणि रेल्वेच्या आरक्षण केंद्राच्या इमारतीवर सनशॉट टेक्नॉलॉजी या कंपनीच्या माध्यमातून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.या यंत्रणेच्या माध्यमातून दरदिवशी सुमारे ६०० ते ६५० युनिटची निर्मिती होणार असून, वर्षाला सव्वा दोन ते अडीच लाख युनिटची वीज बचत होऊन त्यासाठीचा खर्चही वाचणार आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे रेल्वेस्थानकासाठी दररोज लागणाऱ्या विजेपैकी सुमारे ६० टक्के वीज ही या सौरऊर्जा प्रकल्पातून मिळणार आहे. अवघ्या २ महिन्यांत ही यंत्रणा उभारण्यात आली असून, हा प्रकल्प पुढील २५ वर्षे कार्यरत राहणार आहे. हे काम पूर्ण झाले असल्याने त्याचे उद्घाटन करून तो तातडीने कार्यान्वीत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पुणे स्टेशन झळकणार सौरऊर्जेने
By admin | Published: August 31, 2016 1:28 AM